लोखंडी सळ्याही आल्या बाहेर, मूलभूत सुविधांचाही अभाव
अलिबाग : गेटवे-मुंबई ते मांडवा-अलिबागला जलमार्गाने जोडणाऱ्या या मार्गावरील मांडवा येथील नवीन जेट्टीच्या पुलाचे खांब निकामी होण्याच्या मार्गावर असल्याने ही जेट्टी कोणत्याही क्षणी कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या जेट्टीवरील सद्यस्थितीत पुलाच्या खांबांचे सिमेंट गळून पडल्याने लोखंडी सळ्या बाहेर डोकावत असून, त्याच्या दुरुस्तीकडे महाराष्ट्र सागरी मंडळाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे मांडवा येथे गेल्या काही वर्षांपूर्वी नवीन जेट्टी उभारण्यात आली होती. या जेट्टीचे मान्यवरांच्या हस्ते मोठ्या थाटात उद्घाटनही करण्यात आले. मात्र काही वर्षातच निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या जेट्टीवरील पुलाच्या खांबांचे सिमेंट गळून पडत असल्याने अनेक ठिकाणी खांबांच्या लोखंडी सळ्या बाहेर डोकावत आहेत. जेट्टीवर मंत्री, आमदार, खासदार व इतर लोकप्रतिनिधी, तसेच प्रतिष्ठित व्यक्तींना घेण्यासाठी व सोडण्यासाठी त्यांच्या चारचाकी वाहने थेट जेट्टीवर जात असल्याने या जेट्टीला त्यापासूनही मोठा धोका संभवतो आहे. यामुळे जेट्टीवर येजा करणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
या जलमार्गावर पावसाळ्यात सुरक्षेच्या कारणास्तव २५ मे ते ३० ऑगस्टपर्यंत प्रवासी वाहतूक बंद असते. मात्र आता १ सप्टेंबरपासून ही प्रवासी वाहतूक (वादळवारा वगळता) पुन्हा सुरु करण्यात आली आहे. आरामदायी प्रवास असल्यामुळे या मार्गाने हजारोंच्या संख्येने दररोज पर्यटक व अन्य प्रवासी प्रवास करतात. जेट्टीच्या ठिकाणी जेट्टी ते वाहनतळ ठिकाणी येजा करताना दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, स्तनदा माता व आजारी रुग्णांच्या सेवेसाठी असलेल्या वाहनांची संख्या एक ते दोन असून, प्रवाशांची संख्या लक्षात घेता, तीसुद्धा सेवा देण्यासाठी अपुरी व कमी पडत आहे. यामुळे शारिरिक क्षमता कमजोर असलेल्या प्रवाशांना सोबतच्या सामानासह पायी चालत बसपर्यंत किंवा लाँचपर्यत पायी चालत जाताना मन:स्ताप सहन करावा लागत आहे.
या सोबतच जेट्टीवर मोफत पिण्याच्या पाण्याची सोय प्रवाशांसाठी नसल्याने प्रवाशांना अधिकचे पैसे देऊन विकतचे पाणी प्यावे लागत असते, तसेच जेट्टीवर शौचालयाची कोणतीच सोय उपलब्ध नसल्याने महिला प्रवाशांसह सर्वांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. आजारी रुग्ण, दिव्यांगांना बोटीतून चढउतार करण्यासाठी व्हिलचेअरची सुविधा नसल्याने त्यांची गैरसोय आहे.
यासोबतच लाँचची वाट पहाणाऱ्या प्रवाशांना बसण्यासाठी कोणतीच सुविधा उपलब्ध नसल्याने गरोदर माता, स्तनदा माता, आजारी रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आदींना लाँच येईपर्यंत ताटकळते रांगेत उभे राहावे लागते.
दरम्यान, जेट्टीवरील खांब निकृष्ट झाल्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या पर्यटकांचा व इतर प्रवाशांचा जीव धोक्यात आला असतनाच जेट्टीवरील पत्र्याच्या शेडवरील लोखंडी पत्रे गंजल्याने ते काढण्यात आले आहेत, तर काही प्रमाणात पत्रे बसविण्याचे काम संथगतीने सुरू आहे. वाऱ्यामुळे यातील काही पत्रे खाली प्रवाशांच्या अंगावर पडून अपघात होण्याची भीती व्यक्त होत असतानाच पत्र्यांअभावी प्रवाशांना भरपावसात भिजत, तर कधी भरउन्हात उभे राहून बोर्टीची वाट पहावी लागत आहे.
मांडवा जेट्टीवरील प्रवासी जेट्टीचे आयआयटी मुंबई यांच्याकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यासंबंधी शासनाकडे दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठविले आहे. त्या कामाच्या निविदा काढून लवकरात लवकर करणार आहोत, तसेच जेट्टीवरील पत्र्यांच्या शेडचे काम रेमंड कंपनी करीत असून, त्यांना काम करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे. यासोबतच इतर असुविधांचा विचार करून पाठपुरावा केला जात आहे. - प्रविण पाटील, (महाराष्ट्र सागरी मंडळ अधिकारी)






