Saturday, November 1, 2025
Happy Diwali

महापौरपदाचे उमेदवार झोहरान ममदानींनी मोदींवर केले गंभीर आरोप

महापौरपदाचे उमेदवार झोहरान ममदानींनी मोदींवर केले गंभीर आरोप

न्यू यॉर्क : अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील महापौरपदासाठी (मेयर) ४ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. प्रचारावेळी डेमोक्रॅटिक पार्टीचे उमेदवार जोहरान ममदानी यांनी शुक्रवार, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी शहरातील गुरुद्वारात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध वादग्रस्त विधान केले. तसेच शहराचे विद्यमान महापौर एरिक अ‍ॅडम्स यांच्यावरही टीका केली.

'भारत सरकार आणि पंतप्रधान मोदी अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचाराचे धोरण अवलंबतात. त्यांच्यासोबत अ‍ॅडम्सने जवळचे संबंध निर्माण केले आहेत. ज्यामुळे शहरातील गृहनिर्माण, बालसंगोपन आणि मूलभूत राहणीमान खर्च वाढले आहेत. ज्यामुळे शहरातील सामान्यांना आर्थिक संघर्षाला सामोरे जावे लागत आहे. मी निवडून आलो तर न्यू यॉर्क शहरातील जीवन सर्वसामान्यांना परवडणारे असेल, असे जोहरान ममदानी म्हणाले. आपण ज्या भारतात वाढलो त्या बहुलवादी देशात सर्व धर्मीय एकत्र होते. मात्र भाजपच्या नेतृत्वात भारताची कल्पना फक्त विशिष्ट प्रकारच्या भारतीयांसाठीच असल्याचेही ममदानी म्हणाले.

जोहरान ममदानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या महिन्याच्या सुरुवातीला, दिवाळीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात, त्यांनी मोदींना 'युद्ध गुन्हेगार' असे संबोधले होते.

ममदानी यांची अजब मानसिकता

न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक लढवत असलेल्या उमेदवाराने जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीप्रधान देशात सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या पंतप्रधानांवर टीका करण्यातून ममदानी यांची अजब मानसिकता दिसून येते, अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटत आहे.

ममदानी यांचे भारत कनेक्शन

झोहरान ममदानी हे युगांडा आणि अमेरिका या दोन देशांचे नागरिक आहेत. त्यांचे वडील महमूद ममदानी हे मूळचे युगांडाचे आहेत. त्यांचा जन्म भारतात मुंबईत झाला होता. पुढे ते काही वर्षे अमेरिकेत राहिले आणि आता युगांडामध्ये स्थायिक झाले आहेत. तर झोहरान ममदानी यांची आई मीरा नायर यांचा जन्म भारतात ओडिशातील रुरकेला येथे झाला होता. अमेरिकेत असताना त्यांनी महमूद ममदानी यांच्याशी विवाह केला आणि आता त्यांनी युगांडामध्ये स्वतःची चित्रपट प्रशिक्षण अकादमी सुरू केली आहे. याआधी मीरा नायर यांनी भारताशी संबंध दर्शविणारे काही इंग्रजी आणि हिंदी चित्रपट केले. मीरा नायर यांचे चित्रपट हे वेगवेगळ्या कारणांमुळे भारतात वादाला कारणीभूत ठरले. आता त्यांचे पुत्र झोहरान ममदानी यांनी भारताच्या पंतप्रधानांविषयी एक अजब वक्तव्य केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >