पुणे : महाराष्ट्र केसरी ही मानाची स्पर्धा जिंकणं प्रत्येक कुस्तीपट्टूचं स्वप्न असतं. २०२३ - २०२४ वर्षी सोलापूरच्या सिकंदर शेख या पट्ट्याने मानाची महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा जिंकत सोलापूरचे नाव मोठे केले. परंतु पंजाब पोलिसांनी शस्त्र बाळगण्याप्रकरणी सिंकदर शेखसह चार जणांना अटक केली आहे. या अटकेमुळे आंतरराष्ट्रीय शस्त्र पुरवठा साखळीचा पर्दाफाश झाला आहे.
वडिलांनी हमाली करून वाढवलेला पैलवान सिकंदर शेखच्या शस्त्र तस्करीच्या कारनाम्याने आजपर्यंत कमावलेली प्रतिष्ठा धुळीला मिळाली आहे. सांगलीच्या मल्लानी देखील शेखच्या अटकेवर संताप व्यक्त केला आहे.
शेखचा हा गुन्हा अत्यंत गंभीर असून, शस्त्र तस्करी प्रकरणात त्याचा उघड झालेला संबंध आणि त्याच्या संपर्कात महाराष्ट्रात कोण कोण होते याची देखील चौकशी होणं गरजेचं आहे असे मत सांगलीचे ज्येष्ठ मल्ल वस्ताद संजय भोकरे यांनी सिकंदर शेखच्या अटकेबाबत मांडले आहे.
ज्या महाराष्ट्राने सिकंदर शेखला डोक्यावर घेतलं तो महाराष्ट्र या चुकीला पाठीशी घालणार नाही. आणि सिकंदरच्या कुटुंबीयांनीही केल्या जाणाऱ्या आरोपांचे खंडन करणे देखील चुकीचे आहे. एखादा खेळाडू बाबत कुणीच खोटे आरोप करणार नाही., दुसरीकडे सिकंदर शेखच्या विरोधात आणखी पुरावे सापडत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी ही झालीच पाहिजे अशी मागणी भोकरे यांनी केली आहे.
प्रतिष्ठा धुळीला मिळवली
सिकंदर हा मूळचा सोलापूरचा असला तरी त्याने कोल्हापुरातून कुस्तीचं प्रशिक्षण घेतलं. कोल्हापुरातील तालमीमध्ये त्यानं कुस्तीचे धडे गिरवले. २०२३ यामध्ये महाराष्ट्र केसरी हा किताब जिंकला आणि महाराष्ट्रातील घरोघरी पोहोचला.
महाराष्ट्र केसरी जिंकल्यानंतर त्याने अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिकंदर हा गेल्या काही आठवड्यापासून पंजाबमध्ये भाड्याच्या घरात राहून शस्त्र पुरवठा प्रकरणात मध्यस्थ म्हणून काम करत होता .






