Saturday, November 1, 2025
Happy Diwali

महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई

महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई

पंजाब : शस्त्र तस्करी प्रकरणात आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राजस्थानमधील पपला गुर्जर टोळीशी सिकंदरचे संबंध असल्याचे तपासात समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे पंजाब पोलिसांनी सांगितले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील रहिवासी असलेला महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याच्यासह चौघांना सीआयए पथकाने शस्त्र तस्करी प्रकरणात पंजाबच्या मोहाली येथून अटक केली आहे. पंजाब पोलिसांनी आरोपींकडून १.९९ लाख रुपयांची रोकड, पाच पिस्तुले, काडतुसे, दोन एसयूव्ही गाड्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पंजाबच्या खरड पोलिस ठाण्यात आर्म्स अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरियाणा आणि राजस्थानातील कुख्यात पपला गुर्जर टोळीशी महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखचा थेट संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. याच टोळीतील दानवीर आणि त्याचा साथीदार बंटी हे २४ ऑक्टोबर रोजी एसयूव्ही गाडीतून दोन शस्त्रे घेऊन मोहालीत आले होते. ही शस्त्रे सिकंदर शेखकडे देण्याचे ठरले होते. संबंधित शस्त्रे कृष्ण ऊर्फ हॅप्पीकडे पुरवण्याची जबाबदारी सिकंदर शेखवर होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सिकंदरने २०२४ सालचा महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावला होता. तसेच आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू असल्यामुळे त्याला क्रीडा कोट्यातून लष्करात भरतीही करुन घेण्यात आले होते. मात्र लष्करातील नोकरी सोडून गेल्या काही महिन्यांपासून तो तस्करी करत असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट होत आहे. यासाठी तो पंजाबमध्येच वास्तव्यास होता.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >