अलिबाग : आलिशान चारचाकी वाहनाने रेकी करून रायगड जिल्ह्यात भरदिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दापाश केला. पाचपैकी तिघांना रायगड पोलिसांनी अटक केली असून, अन्य दोन आरोपींचा तपास पोलीस करीत आहेत. अटक केलेल्या आरोपींकडून चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी एकूण १५ लाख ५० हजार रुपये किमतीचे सुवर्णालंकार जप्त करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी याबाबतची माहिती दिली.
अटक केलेल्या तीन आरोपींमध्ये शाहनवाज कुरेशी, शमीम कुरेशी आणि हिना कुरेशी यांचा समावेश आहे, तर फरार आरोपींमध्ये नौशाद कुरेशी आणि एहसान यांचा समावेश आहे. मागील काही महिन्यात रायगड जिल्हयातील रोहा, पोलादपूर, पाली, महाड आणि श्रीवर्धन पोलीस ठाणे हद्दीत भरदिवसा घरफोडीचे अनेक प्रकार घडले असून, सदर चोरी करणारे अनोळखी आरोपीत हे आलिशान चारचाकी होंडा सिटी वाहनाचा वापर करून उच्चभ्रू सोसायटीमध्ये भरदिवसा घुसून सोसायटीमधील बंद घराचे लॉक तोडून घरातील मौल्यवान दागदागिने, तसेच रोकड चोरी केल्याचे अनेक गुन्हे दाखल झाले होते.
त्याआधारे तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची तीन वेगवेगळी पथके तयार केली गेली होती; परंतु आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश येत नव्हते. दरम्यान संशयित आरोपीत हे पुन्हा सफेद रंगाची होंडा सिटी कार घेऊन रायगड जिल्हयातील माणगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये आल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार सदरची गाडी अडविण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली होती; परंतु सदर आरोपींनी नाकाबंदीसाठी लावलेले बॅरेकेट्स, तसेच आडवी उभी केलेली वाहने यांना चकवा देऊन ते नाकाबंदीमधून पळून गेले. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये, तसेच शेजारील जिल्ह्यांमध्ये संपर्क साधून सदर होंडासिटी वाहनाचा शोध घेण्याबाबत पोलीस यंत्रणा सक्रीय करण्यात आली होती.
या अनोळखी आरोपींचा शोध घेण्यासाठी सपोनि भास्कर जाधव, सपोनि मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाला सिकंदराबाद येथे रवाना करण्यात आले. या पथकाने सतत एक महिना आरोपीत राहात असलेल्या परिसरामध्ये वेश पालटून रेकी करून या आरोपींच्या ठावठिकाणाबाबत सविस्तर माहिती प्राप्त केली. सदरचे आरोपीत हे अत्यंत सराईत असून, त्यांच्यावर खुनाचे दोन गुन्हे, खुनाचा प्रयत्न करण्याचे ४ गुन्हे, आर्म्स अॅक्टचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी सांगितले.






