मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. प्रायोगिक परीक्षा जानेवारी आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये घेतल्या जातील. अतिविलंब शुल्कासह अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२५ आहे.
बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरू होऊन १८ मार्चपर्यंत चालणार आहे. दहावीची लेखी परीक्षा २० फेब्रुवारीपासून सुरू होऊन १८ मार्च २०२६ रोजी संपणार आहे. बारावीच्या प्रायोगिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यांकन परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात येणार आहेत. या काळात विज्ञान शाखेच्या प्रायोगिक परीक्षा, वाणिज्य शाखेतील प्रोजेक्ट मूल्यांकन आणि कला शाखेतील तोंडी परीक्षा पूर्ण करण्यात येतील. दहावीच्या प्रायोगिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यांकन परीक्षा २ फेब्रुवारी ते बुधवार, १८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पार पडतील.
या दरम्यान शारीरिक शिक्षण, आरोग्यशास्त्र, गृहशास्त्र अंतर्गत आणि कला विषयांच्या मूल्यांकन परीक्षा शाळास्तरावर घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी त्यानुसार तयारी करून वेळेचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विषयवार वेळापत्रक आणि सूचना मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर पाहता येतील, अशी माहिती मंडळाचे सचिव दीपक माळी यांनी दिली.
अतिविलंब शुल्कासह अंतिम मुदत जाहीर
शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी पात्र विद्यार्थ्यांसाठी नोंदणी अर्ज क्रमांक १७ सादर करण्यासंदर्भात महत्त्वाची सूचना जाहीर केली आहे. अतिविलंब शुल्कासह अर्ज भरण्याचा कालावधी १ नोव्हेंबर २०२५ ते ३१ नोव्हेंबर २०२५ पर्यंत आहे. अतिविलंब शुल्क म्हणून प्रति विद्यार्थी प्रति दिवस २० रुपये आकारण्यात येणार आहे. या कालावधीनंतर कोणत्याही परिस्थितीत अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. विद्यार्थ्यांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीनेच करावी लागेल. यासाठी www.mahahsscboard.in या वेबसाइटवर आवश्यक सर्व सूचना, माहितीपत्रक आणि मार्गदर्शक पुस्तिका उपलब्ध आहे.






