राजकीय पुनर्वसनासाठीच बच्चू कडूंचे दबावतंत्र

गत मंगळवारपासून आधी नागपूरला आणि पर्यायाने उभ्या विदर्भाला वेठीस धरणारे माजी मंत्री बच्चू कडू यांचे महाएल्गार आंदोलन अखेर निकाली निघाले आहे. ३० जून २०२६ पर्यंत महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने बच्चू कडू यांच्या या आंदोलनाचा शेवट अखेर ‘गोड’ झाला आहे.


शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त केले जावे, त्यांच्या पिकाला हमीभाव मिळावा, ओल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी, तसेच दुधाला भाव वाढवून मिळावा.इत्यादी आठ मागण्यांसाठी अमरावती जिल्ह्यातील बेलोरा या गावातून सोमवारी बच्चू कडू यांनी ही महाएल्गार यात्रा सुरू केली होती. या यात्रेत ते स्वतः ट्रॅक्टर चालवत सहभागी झाले होते. त्याचबरोबर इतर शेतकरीदेखील ट्रॅक्टर आणि इतर वाहने घेऊन या यात्रेत सहभागी झाले होते. बेलोराहून निघून वर्धा मार्गे मंगळवारी संध्याकाळी ही महाएल्गार यात्रा नागपूरच्या वेशीवर पोहोचली. नागपूर ग्रामीण पोलिसांनी बच्चू कडूंच्या या महाएल्गार यात्रेला वर्धा मार्गावर परसोडी येथील एका मैदानावर एक दिवसासाठी आंदोलन करण्याची परवानगी दिली होती. मात्र बच्चू कडू यांनी अलीकडेच समृद्धी महामार्गाच्या सुरुवातीला आपली यात्रा थांबवली आणि तिथेच ठिय्या दिला. परिणामी चारही बाजूचे रस्ते ब्लॉक झाले होते. प्रत्येक रस्त्यावर १५ ते २० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यात अनेक प्रवासी वाहने तर होतीच, पण त्याचबरोबर रुग्णवाहिका देखील होत्या.


एव्हाना बच्चू कडूंसोबत राजू शेट्टी, रविकांत तुपकर, महादेव जानकर, प्रकाश पोहरे, विजय जावंदिया असे सर्व शेतकरी नेतेदेखील या यात्रेत सहभागी झाले होते. भरीस भर मनोज जरांगे-पाटील देखील येथे येऊन पोहोचले होते. त्यामुळे काय होणार ही सर्वांनाच चिंता लागून राहिली होती. मंगळवारी संध्याकाळी सुरू झालेले हे नाट्य बुधवारी दिवसभर चालले. जवळजवळ दहा हजार आंदोलक आणि त्यांच्या जवळजवळ २००० गाड्या आणि ट्रॅक्टर्स यांनी पूर्ण रस्ता अडवून टाकला होता. आंदोलक मागे हटायला तयार नव्हते. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वतःहून जन याचिका दाखल करून घेत संध्याकाळी ६ वाजेपर्यंत रस्ता मोकळा करा असे पोलिसांना आदेश दिले. मात्र बच्चू कडू ऐकायला तयार नव्हते. आम्ही न्यायालयाचा आदर करतो. तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाका असे आव्हान त्यांनी सरकारला दिले. या दरम्यान आता आम्ही रेल्वे सुद्धा रोखणार अशी धमकी देखील दिली आणि काही शेतकरी बाजूने जाणाऱ्या रेल्वे मार्गावर जाऊन देखील बसले होते. एकूणच पोलिसांच्या कसोटीचा हा काळ होता.


दरम्यान राज्य मंत्रिमंडळातील मंत्री गिरीश महाजन आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोनवर बच्चू कडू यांच्याशी बोलणे केले आणि संध्याकाळी आशीष जयस्वाल आणि पंकज भोयर हे राज्य मंत्रिमंडळातील दोन मंत्री शेतकऱ्यांशी चर्चा करायला आले. रात्री उशिरापर्यंत रस्त्यावरच चर्चा होऊन मग दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी मुंबईत मुख्यमंत्री संबंधित मंत्री आणि संबंधित खात्याचे सचिव या सर्वांसोबत चर्चा करून मार्ग काढण्याचा निर्णय झाला. बच्चू कडूंनी मग आपल्या शेतकऱ्यांची तिथे जवळच्या मंगल कार्यालयात सोय केली आणि गुरुवारी ते मुंबईला रवाना झाले. त्यांच्यासोबत इतर सर्व शेतकरी नेतेदेखील आलेले होते. मुंबईत मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत जो काही निर्णय झाला तो वाचकांना ज्ञात आहेच. त्यामुळे आंदोलन आता संपलेले आहे. दरम्यान नागपूर परिसरात आलेल्या संततधार पावसामुळे शेतकरी सुद्धा आपापल्या गावी रवाना झाले असल्याचे कळते आहे.


वस्तूतः मुख्यमंत्र्यांनी आम्ही योग्य वेळी कर्जमाफी देणारच आहोत असे जाहीर केले होते. तरीही बच्चू कडू यांनी हे सर्व महाएल्गार यात्रेचे उद्योग करण्यामागे आणि त्यायोगे सर्वसामान्य जनता आणि सरकारला वेठीस धरण्यामागे शेतकऱ्यांचे हित दुय्यम आहे, तर आपले राजकीय पुनर्वसन हा महत्त्वाचा हेतू असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. २००४ पासून बच्चू कडू हे त्यांच्या प्रहार संघटनेमार्फत निवडणूक लढवून विधानसभेत निवडून येत होते. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात देखील त्यांची वर्णी लागली होती. एकनाथ शिंदे यांच्यासोबत कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या ५० आमदारांमध्येही त्यांचा समावेश होता. मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा भाजपच्या नितीन तायडेंकडून पराभव झाला. तरीही आपली कुठेतरी सोय लागावी यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. त्यासाठीच शेतकऱ्यांचा मुद्दा घेऊन आधी एक पदयात्रा मग गुरुकुंज मोझरी येथे लाक्षणिक उपोषण आणि आता ही महाएल्गार यात्रा काढून ते आपल्या राजकीय वजन जमवण्याच्या मागे आणि त्यायोगे सत्ताधारी पक्षावर दबाव आणण्याच्या मागे लागले आहेत असे बोलले जात आहे. यातून शेतकऱ्यांच्या समस्या कदाचित सुटतीलही, मात्र बच्चू कडू यांचे राजकीय पुनर्वसन या फडणवीस यांच्या कालखंडात होणे कठीण असल्याचे बोलले जात आहे. तरीही बच्चू कडू अशा वेगवेगळ्या करामती करत आपला दबाव वाढवत राहणार हे चित्र आज दिसते आहे. त्यात त्यांना किती यश येईल हे आज सांगणे कठीण आहे.


- अविनाश पाठक

Comments
Add Comment

भारताचे ‘बाहुबली’ यश

नुकतेच ‘इस्रो’चे प्रचंड क्षमतेचे ‘बाहुबली’ रॉकेट प्रक्षेपित करून देशाने आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक पाऊल पुढे

मतांसाठी ‘मोफत आश्वासनां’ची शर्यत

महापालिका निवडणुका जवळ येत आहेत; तसे मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या मोफत आश्वासनांची खैरात

रस्तेबांधणीचा नवा विक्रम

उच्च क्षमतेचे राष्ट्रीय जाळे उभारण्याच्या प्रयत्नांमुळे २०२५ मध्ये भारताच्या रस्ते पायाभूत सुविधांमध्ये

कोल्हापूर, सांगली, इचलकरंजीमध्ये कडवी लढत

वार्तापत्र : दक्षिण महाराष्ट्र काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला असणाऱ्या कोल्हापूर, सोलापूर, सांगली या दक्षिण

चला मतदान करूया!

निवडणुकांमध्ये काही मतांच्या फरकाने निकाल बदलले आहेत. एक मत म्हणजे एक आवाज. लाखो मतदारांचा मिळून तयार होणारा हा

कोकणात ओल्या काजूगराची क्रेझ

वार्तापत्र कोकण संतोष वायंगणकर कोकणातील हापूस आंबा, नारळ, फणस, कोकम, काजू, सुपारी, बांबू, जांभुळ, करवंद या