Friday, October 31, 2025
Happy Diwali

पवईतील एन्काऊंटरवर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा काय म्हणाले ?

पवईतील एन्काऊंटरवर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा काय म्हणाले ?

मुंबई : पवईतील स्टुडिओत घडलेल्या ओलीस नाट्य आणि त्यानंतर झालेले आरोपी रोहित आर्य याच्या एन्काऊंटरवर अनेक प्रश्न केले जात आहेत. या प्रकरणात अनेक जणांनी कोर्टात जाण्याची तयारी केली आहे. पवईत घडलेल्या या एन्काऊंटर संदर्भात आता माजी पोलिस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी आपले मत मांडले आहे.

माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी त्यांच्या कारकीर्दीत अंडरवर्ल्डच्या अनेक गँगस्टरचे एन्काऊंटर केले आहे. प्रदीप शर्मा यांना या संदर्भात विचारले असता त्यांनी सांगितले की, माझ्या मते जे झाले ते योग्य आहे. पोलिसांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून १७ मुलांना वाचवलं आहे. आरोपीने सर्वत्र केमिकल्स फवारुन ठेवली होती. आग लागण्याचा धोका होता.

प्रदीप शर्मा पुढे म्हणाले की, एन्काऊंटर ठरवून केला जात नाही, अचानक होत असतो. एकतर गोळी खा नाही तर गोळी द्या, मग पोलिस तर गोळी देणारच. आयपीसी कलम १०० प्रमाणे पोलिसांना पॉवर देण्यात आलेली आहे. बलात्कार होत असताना, बंदी बनवले असेल, जीवाला धोका असेल तर बळाचा वापर करण्याचा अधिकार कायद्याने पोलिसांना दिला आहे. तंतोतंत कायद्याचे पालन झाले आहे, असे माझे मत असल्याचे शर्मा यांनी म्हटले आहे.

हा फेक एन्काऊंटर नाही. स्वतःचे पैसे वसूल करायला आरोपीने लहान मुलांचा वापर केला हे कितपत योग्य आहे. अमोल वाघमारे याने सोसायटी, समाजासाठी हे केले आहे. १७ मुलांचा जीव वाचवला आहे. त्यांचं कौतुक करायला हवे. अशाप्रकारे कोर्टात जाणे चुकीचे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. लहान मुलांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून केलेला हा एन्काऊंटर जस्टीफाईड आहे. पोलिसांनी काही घाबरायची गरज नाही. जनता पोलिसांच्याबरोबर आहे, असेही प्रदीप शर्मा यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >