Friday, October 31, 2025
Happy Diwali

देशभरात साजरा करणार ‘आदिवासी गौरव वर्ष पंधरवडा’

देशभरात साजरा करणार ‘आदिवासी गौरव वर्ष पंधरवडा’

नवी दिल्ली : आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या राष्ट्रीय आदिवासी विद्यार्थी शिक्षण संस्थेच्या (NESTS) नेतृत्वाखाली देशभरातील एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये (EMRS) १ ते १५ नोव्हेंबर २०२५ दरम्यान “आदिवासी गौरव वर्ष पंधरवडा” आयोजित केला जाणार आहे. महान आदिवासी स्वातंत्र्यसैनिक आणि आदरणीय नेते भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबरला “आदिवासी गौरव दिन साजरा करून या पंधरवाड्याचा समारोप होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदिवासी नायकांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि आदिवासी तरुणांना सक्षम करण्यासाठीच्या दूरदृष्टीने प्रेरित होऊन या पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा पंधरवडा विद्यार्थ्यांना भारताच्या आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या गौरवशाली इतिहासाची माहिती देईल. यावेळी आदिवासी कला, संस्कृती आणि परंपरा जपल्या जातील. देशभरातील EMRS मध्ये सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. यातून आदिवासी परंपरेचे दर्शन घडणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा विकास करण्याच्या हेतूने सर्व EMRS मध्ये पदयात्रा आणि कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. या कार्यक्रमांचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये अभिमान, एकता आणि जागरूकता निर्माण करण्याचा आहे. यामुळे विद्यार्थ्यांना देशाच्या इतिहासात आणि विकासात आदिवासी समुदायांची भूमिका समजण्यास मदत होणार आहे. या पंधरवड्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या दोन शाळांचा सन्मानदेखील केला जाणार आहे.

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा देशभरातील ४९७ EMRS मधील १.५ लाखांहून अधिक विद्यार्थी आदिवासी गौरव वर्ष पंधरवडा आणि आदिवासी गौरव दिन या उत्सवात सहभागी होणार आहेत. हे विद्यार्थ्यांच्या सामूहिक उत्साहाचे आणि स्वातंत्र्यसैनिकांप्रती असलेल्या आदराचे प्रतीक असेल.

या उपक्रमांद्वारे, NESTS आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये स्वाअभिमान आणि ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. “आदिवासी गौरव वर्ष २०२५ ” हा उत्सव साजरा करणे ही भगवान बिरसा मुंडा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणे आणि विकसित भारताच्या प्रवासाला प्रेरणा देणे ही आहे.

दरम्यान, राष्ट्रीय आदिवासी विद्यार्थी शिक्षण संस्था (NESTS) ही भारत सरकारच्या आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी एक स्वायत्त संस्था आहे. देशभरात स्थापन झालेल्या एकलव्य मॉडेल निवासी शाळांद्वारे (EMRS) आदिवासी मुलांना दर्जेदार शिक्षण देणे, त्यांचा विकास करणे आणि आदिवासी संस्कृती आणि मूल्ये जपणे हे या संस्थेचे कार्य आहे.

Comments
Add Comment