 
                            मुंबई (खास प्रतिनिधी) : आगामी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत उबाठाने आता तरुणांना आणि नवीन चेहऱ्यांनाच अधिक प्राधान्य देण्याचा निर्धार केला आहे. उबाठाचे अनेक माजी नगरसेवक हे शिवसेनेत जात असल्याने आता उबाठाचा आपल्याच माजी नगरसेवकांवर विश्वास नाही. त्यामुळे उबाठाची नवीन फळी निर्माण करण्यासाठी विद्यमान जुन्या माजी नगरसेवकांना पुन्हा संधी देण्यात येणार नसून यामध्ये वयाची पन्नाशी पार केलेल्यांचा पत्ता कापला जाणार आहे. यामध्ये माजी महापौर श्रध्दा जाधव, किशोरी पेडणेकर यांच्यासह शुभदा गुडेकर, सदा परब, दीपमाला बढे, विठ्ठल लोकरे, अनिल पाटणकर, चित्रा सांगळे, मिलिंद वैद्य, आशिष चेंबूरकर, सिंधु मसुरकर, अरुंधती दुधवडकर आदी माजी नगरसेवकांचे पत्ते कापले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबरोबरच नगरसेवक बनण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या पक्षाच्या शाखाप्रमुख, उपविभाग प्रमुख आणि विभाग प्रमुख यांच्याही ह्दयात आता धाकधुक वाढली गेली आहे.
मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठाने आपल्या पक्षात मोठे बदल करण्याचे संकेत दिले आहेत. 'उबाठा' शिवसेना आता महापालिकेच्या निवडणुकीत नवीन आणि तरुण चेहऱ्यांना संधी देण्याच्या तयारीत आहे. पक्षाला अधिक गतीमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो,असे पक्षाने स्पष्ट केले. ज्यामध्ये ५०-५५ वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या आणि प्रदीर्घ काळ नगरसेवकपद भूषवलेल्या अनेक विद्यमान माजी नगरसेवकांना यंदा तिकीट नाकारले जाण्याची शक्यता आहे. तरुण आणि तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून महापालिकेत अधिक प्रभावी कामगिरी करण्याचा पक्षाचा मानस आहे. त्यामुळे उबाठाकडून आता कार्यक्षमता, सार्वजनिक प्रतिमा आणि निवडून येण्याची क्षमता या निकषांवरच विद्यमान माजी नगरसेवक तसेच सक्रिय पदाधिकारी यांचे पुनर्मूल्यांकन केले जात आहे. ज्यांच्यावर जनतेचा रोष आहे किंवा ज्यांनी प्रदीर्घ काळ सत्ता उपभोगली आहे, अशा ज्येष्ठांचा पत्ता कापला जाऊ शकतो.
हा निर्णय केवळ वयाच्या निकषावर आधारित नसून, परफॉर्मन्स आणि जनतेमधील लोकप्रियता यावर आधारीत असून केवळ ज्येष्ठ माजी नगरसेवकांसोबतच इच्छुक पदाधिकाऱ्यांचेही राजकीय भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे सन २०१७ मध्ये निवडून आलेल्या आणि जात पडताळणीमध्ये निवडून आलेल्या एकूण १०२ नगरसेवकांपैंकी आतापर्यंत एकनाथ शिंदे मुख्य नेता असलेल्या शिवसेनेत ५३ माजी नगसेवक गेलेे आहेत. त्यामुळे आता उबाठाकडे केवळ ४९ माजी नगरसेवक उरले आहेत. त्या उरलेल्या माजी नगरसेवकांपैंकी वयाची पन्नाशी पार केलेले अनेक माजी नगरसेवक आहेत.

 
     
    




