 
                            कल्याण : २०२४ मध्ये शासनाने १५ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार २७ कोटी निधी मंजूर केला. त्यामुळे या दिवाळीत २७ गावातील एकूण २०७ रस्त्यांपैकी १४० रस्त्यांवरील एकूण २८०० पथदिवे कार्यान्वित केल्यामुळे या दीपावलीत २७ गावातील रस्ते पथदिव्यांनी उजळल्यामुळे खऱ्या अर्थाने दीपावली साजरी झाली. उर्वरित ६७ रस्त्यांवरील पथदिवे ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचा महापालिकेचा मानस असल्याची माहिती विद्युत विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली आहे.
सन २०१५ मध्ये २७ गावे ही महापालिका क्षेत्रात समाविष्ट झाल्यानंतर या २७ गावांमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पथदिवे व्यवस्था नव्हती. तसेच काही रस्त्यांवर असलेली पथदिवे व्यवस्था ही सुद्धा तांत्रिक दृष्ट्या सक्षम नव्हती. महापालिकेने महापालिकेच्या अंदाजपत्रकामधून काही रस्त्यांवर पथदिवे व्यवस्था केली; परंतु ती पुरेशी नव्हती. सन २०२३ मध्ये २७ गावांमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पथदिवे व्यवस्था करणेकामी २७ कोटी निधीची मागणी महापालिकेने महाराष्ट्र शासनाकडे केली होती. २७ गावांमधील २०७ रस्त्यांवर ४६७९ पथदिवे पोल व ५२३५ पथदिवे व्यवस्था करणेकामी ऑगस्ट २०२४ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली. प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर प्रशासनाने तातडीने पुढील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून ऑक्टोबर २०२४ मध्ये कामास सुरुवात केली.
महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी महापालिका आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर २७ गावातील पायाभूत सुविधेबाबत विशेष लक्ष देऊन तातडीने सर्व कामे हाती घेण्याचे निर्देश सर्व विभाग प्रमुखांना दिले होते. २७ गावातील पथदिवे कामाचा आढावा आयुक्त स्तरावर वेळोवेळी झाल्याने २७ गावातील पथदिवे कामांना गती मिळाली.

 
     
    




