 
                            मुंबई : मुंबईतील वाढत्या गर्दीमुळे नागरिकांसाठी असणाऱ्या सोयीसुविधा दिवसेंदिवस अपुऱ्या पडत चालल्या आहेत. अश्यातच रेल्वे प्रशासनाने गाडी व्यस्थापनेसाठी एक महत्वाचा निर्णय घेतलं आहे. मुंबईतील पाच रेल्वे स्थानकांसह देशभरातील ७६ रेल्वे स्थानकांत यासाठी स्वतंत्र व्यवस्था अर्थात ‘पॅसेंजर होल्डिंग एरिया’ उभारण्यात येणार आहे. यामुळे फलाटांवरील गर्दी विभागण्यासह सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने रेल्वेगाड्यांमध्ये चढ-उतार करणे प्रवाशांन अधिक सोयीचे होणार आहे.
'पॅसेंजर होल्डिंग एरिया' हा सर्वात प्रथम दिल्लीत उभारला गेला. दिवाळी आणि छठपूजेनिमित्त येणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी दिल्ली रेल्वे स्थानक परिसरात ६००० चौमी क्षेत्रावर प्रवाशांसाठी स्वतंत्र जागा निर्माण करण्यात आली होती. अवघ्या चार महिन्यांत या जागेची निर्मिती करण्यात आली. रेल्वेगाडी पकडण्यासाठीचे प्रवासी, आरक्षित तिकीटधारक प्रवासी आणि तिकीट घेणारे प्रवासी असे विभाग करण्यात आले होते. याच ठिकाणी तिकीट सुविधेसह प्रतीक्षागृहे, स्वच्छतागृहे, वैद्यकीय कक्ष अशा सुविधा उभारण्यात आल्या होत्या. दिव्यांग प्रवाशांसाठीही स्वतंत्र सुविधा देण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
दिल्ली मॉडेल यशस्वी
रेल्वे गर्दी व्यवस्थापनेचे 'दिल्ली मॉडेल' यशस्वी ठरल्याने देशातील प्रमुख रेल्वे स्थानकात या नुसार काम करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, पुणे , नाशिक रोड, नागपूर या स्थानकांवर आणि पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस गर्दी व्यवस्थापनेसाठी स्वतंत्र जागेची निर्मिती करण्यात येणार आहे. सन २०२६ मधील उत्सवांचा हंगाम सुरु होण्यापूर्वी हे काम पूर्ण करण्यात येईल असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
मुंबई रेल्वे टर्मिनसवरील जागेची मर्यादा लक्षात घेता त्यात आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार आहेत. राज्यातील अनेक रेल्वे स्थानकांत जागा उपलब्ध असल्याने दिल्ली मॉडेलनुसार गर्दीचे व्यवस्थापन करण्यात येईल. यंदाच्या दिवाळी-छठपूजेसाठी सीएसएमटी येथे 1,200 चौमी आणि एलटीटी येथे दहा हजार चौमी क्षेत्रावर तात्पुरत्या जागा निश्चित करण्यात आल्या होत्या. रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने या जागेतून रोज हजारो प्रवाशांचे सुरक्षित व्यवस्थापन करण्यात आले.
याच धर्तीवर आता मुंबईत कायमस्वरूपी जागेची निवड करण्यात येणार आहे, असे मुंबईतील रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यंदा दिवाळी-छठपूजेसाठी नियमित रेल्वेगाड्या वगळता भारतीय रेल्वेने बारा हजारांहून अधिक विशेष रेल्वे फेऱ्यांचे नियोजन केले होते. यातील मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवरील स्थानके आणि टर्मिनसमधून प्रत्येकी एक हजारांहून अधिक रेल्वेफेऱ्या चालवण्यात आल्या होत्या.

 
     
    




