 
                            मोहित सोमण: आजपासून ७२७८.०२ कोटींचा लेन्सकार्ट लिमिटेडचा आयपीओ (Lenskart IPO) बाजारात दाखल झाला आहे. पहिल्याच दिवशी कंपनीच्या आयपीओला दुपारी १२.१९ वाजेपर्यंत एकूण ०.१८ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. ज्यामध्ये ०.६८ पटीने किरकोळ गुंतवणूकदारांकडून व ०.१४ पटीने सबस्क्रिप्शन विना संस्थात्मक गुंतवणूकदारां कडून मिळालेले आहे. सुरूवातीच्या कलात तरी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (Foreign Institutional Investors FII) कोणतीही गुंतवणूक अद्याप झालेली नाही. आयपीओ सुरू होण्यापूर्वीच कंपनीला जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. अँकर गुंतवणूकदारांकडून कंपनीने ६८००० कोटींची गुंतवणूक केली होती. एसबीआयनेही थेट १०० कोटींची गुंतवणूक आयपीओ पूर्व प्लेसमेंटमध्ये केली होती.
कंपनीच्या आयपीओपूर्व कालावधीतील शेवटची जीएमपी (Grey Market Price) ७१ रुपये नोंदवली गेली आहे. तज्ञांच्या मते, हा आयपीओ प्रति शेअर १७.६६ प्रिमियमसह बाजारात सूचीबद्ध (Listed) होऊ शकतो. कंपनीचा आयपीओ आज ३१ ऑक्टोबरपासून बाजारात दाखल झाला असून तो ४ नोव्हेंबरपर्यंत बाजारात गुंतवणूकदारांसाठी दाखल होणार आहे.
माहितीनुसार, कंपनीने प्राईज बँड ३८२ ते ४०२ रूपये प्रति शेअर निश्चित केला होता. नोव्हेंबर १० ला कंपनीचा शेअर बीएसई व एनएसईवर सूचीबद्ध होणार आहे. ७२७८.०२ कोटी बुक व्हॅल्यू असलेल्या आयपीओसाठी २१५० कोटी शेअर फ्रेश इशूसाठी उपलब्ध असून उर्वरित ५१२८.०२ कोटी मूल्यांकन असलेले १२.७६ कोटी शेअर ऑफर फॉर सेल (OFS) विक्रीसाठी उपलब्ध असतील. किरकोळ गुंतवणूकदारांना (Retail Investors) किमान १४८७४ रूपये (३७ शेअर) गुंतवणूक अनिवार्य असणार आहे.
एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ७४.८४% वाटा, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून १४.९७% वाटा, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ९.९८% वाटा, कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी ०.२२% वाटा उपलब्ध असणार आहे. पियुष बन्सल, नेहा बन्सल, सुमित कपाही हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत.
माहितीनुसार, आयपीओसाठी कंपनीने उभे केलेले ७२७८ कोटी रुपयांच्या इश्यू आकाराच्या जवळपास १० पट आणि ३२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेल्या अँकर बुक आकाराच्या २० पट आहे.
बीएसईच्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या परिपत्रकानुसार, अँकर बुकमध्ये सुमारे ७० मार्की गुंतवणूकदारांचा सहभाग होता, ज्यात सिंगापूर सरकार, मॉनेटरी अथॉरिटी ऑफ सिंगापूर, टी रो प्राइस, ब्लॅकरॉक, फिडेलिटी, नोमुरा आणि गोल्डमन सॅक्स यासारख्या आघाडीच्या जागतिक संस्थांचा समावेश होता. अँकर बुकमध्ये परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा वाटा सुमारे ५२% होता.
कोटक महिंद्रा कॅपिटल, मॉर्गन स्टॅनली इंडिया, एव्हेंडस कॅपिटल, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया, अॅक्सिस कॅपिटल आणि इंटेन्सिव्ह फिस्कल सर्व्हिसेस यांना बुक बिल्ड इश्यूचे लीड मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
व्हेंचुरा सिक्युरिटीजने आयपीओसाठी 'बाय' कॉल दिला आहे व असे म्हटले आहे की लेन्स्कार्ट सोल्युशन्स लिमिटेडने लक्षणीय वाढ नोंदवली आहे, आर्थिक वर्ष २०२५ साठी महसूल ६६५२.५ कोटींवर पोहोचला आहे, जो मागील आर्थिक वर्षापेक्षा लक्षणीय वाढ आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०२४ मध्ये झालेल्या निव्वळ तोट्यापासून आर्थिक वर्ष २०२५ मध्ये २९५६ कोटी निव्वळ नफ्यापर्यंत मोठी आर्थिक उलाढाल साधली. कंपनीने आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ९७१.१ कोटीचा ईबीटा (EBITDA) नोंदवला, ज्यामध्ये विक्रीत चांगली वाढ आणि ऑपरेशनल कार्यक्षमता यामुळे १४.७% ईबीटा मार्जिन होते.'
तरीदेखील बाजार निरीक्षकांच्या मते, लेन्सकार्टचे शेअर्स लिस्टिंगपूर्वी अनधिकृत बाजारात प्रीमियमवर व्यवहार करत होते. इन्व्हेस्टॉर्गेनच्या डेटानुसार प्रति शेअर ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) ६४ रुपये होता, जो सुमारे १६ टक्के संभाव्य लिस्टिंग नफा दर्शवितो. आयपीओ वॉचने सुमारे १२% प्रीमियमवर किंचित कमी नोंदवले आहे.
कंपनीला आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर २५% अधिक महसूल (Revenue) मिळाला होता तर कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit after tax PAT) इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ३०२८% अधिक नफा मिळाला होता. कंपनीच्या ईबीटामध्ये मात्र इयर बेसिसवर ९७१.०६ कोटींवरून ३३६.६३ कोटींवर घसरण झाली होती. कंपनीचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ६९७२६.८३ कोटी रुपये आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर भांडवली खर्चासाठी (Capital Expenditure), स्टोअर लीज, भाडेपट्टी व इतर संबंधित खर्चासाठी, तंत्रज्ञानात गुंतवणूकीसाठी, ब्रँड पोझिशनिंग बिल्डिंगसाठी, अधिग्रहणासाठी, व इतर दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे.
२००८ मध्ये स्थापन झालेली लेन्सकार्ट सोल्युशन्स लिमिटेड ही एक तंत्रज्ञान-केंद्रित चष्मा कंपनी आहे जी प्रिस्क्रिप्शन चष्मे, सनग्लासेस, कॉन्टॅक्ट लेन्स आणि अँक्सेसरीजच्या डिझाइन, उत्पादन, ब्रँडिंग आणि किरकोळ विक्रीमध्ये गुंतलेली आहे. भारत ही त्याची प्राथमिक बाजारपेठ आहे आणि रेडसीअर अहवालानुसार, कंपनीने आर्थिक वर्ष २०२५ मध्ये भारतात प्रिस्क्रिप्शन चष्म्यांची सर्वाधिक विक्री नोंदवली.डायरेक्ट-टू-कंझ्युमर मॉडेल अंतर्गत कार्यरत, कंपनी तिच्या स्वतःच्या ब्रँड आणि सब-ब्रँड अंतर्गत चष्म्यांची विस्तृत श्रेणी ऑफर करते, जे सर्व वयोगटातील आणि किंमत विभागांना सेवा देते. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये, १०५ नवीन संग्रह लाँच करण्यात आले, ज्यात सुप्रसिद्ध ब्रँड आणि व्यक्तिमत्त्वांसह सहकार्य समाविष्ट आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत, लेन्सकार्टने जागतिक स्तरावर २,७२३ स्टोअर्स चालवले. भारतात २०६७ आणि परदेशात ६५६, भारतात १७५७ मालकीचे आणि ३१० फ्रँचायझी स्टोअर्स आहेत. भारतातील १६८ दुकानांमध्ये आणि जपान आणि थायलंडसह निवडक आंतरराष्ट्रीय ठिकाणी १३६ नेत्रतज्ज्ञांद्वारे दूरस्थ डोळ्यांची तपासणी केली जाते.

 
     
    




