 
                            नवी मुंबई : ऑस्ट्रेलियाला महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात धूळ चारल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सच्या डोळ्यात अश्रू होते. हे अश्रू आनंदाचे होते, विश्वासाचे होते आणि स्वप्ने प्रत्यक्षात उतरल्याचे होते. ३३९ धावांचा डोंगर गाठण्यासाठी जेव्हा भारतीय संघ मैदानावर उतरला, तेव्हा चाहत्यांना कुठेतरी वाटत होते की, ऑस्ट्रेलियासारख्या संघासमोर कदाचित हे अशक्य आहे. पण, एका बाजूला उभी असलेल्या जेमिमाला मात्र हे शक्य वाटत होते. दुसऱ्या बाजूने विकेट्स पडत राहिल्या, पण जेमिमाचा आत्मविश्वास वाढत राहिला.
जेमिमाने शतक पूर्ण केल्यानंतरही तिने कोणताही आनंद व्यक्त केला नाही, कारण तिला माहीत होते की या शतकापेक्षा भारताचा विजय महत्त्वाचा आहे. देशाचा विजय, जो संघाला फायनलमध्ये घेऊन जाईल. झालेही तसेच. जेमिमा शेवटपर्यंत क्रीझवर टिकून राहिली. तिने संयमही दाखवला आणि जोशही. अखेरीस १२७ धावांची नाबाद खेळी करून फायनलचे तिकीट मिळवलेच.
विजयानंतर जेमिमा झाली भावूक
सामन्यादरम्यान जेव्हा कॅमेरा जेमिमाकडे गेला, तेव्हा ती काहीतरी पुटपुटताना ऐकू आली. ती वरच्या देवाकडे भारताच्या विजयासाठी प्रार्थना करत होती. सामना संपल्यावर जेव्हा स्टेडियम भारत आणि जेमिमाच्या घोषणेने निनादले, तेव्हा जेमिमाच्या डोळ्यांतून अश्रू ओसंडून वाहिले.
THIS IS WHAT IT MEANS! 💙🥹 👉 3rd CWC final for India 👉 Highest-ever run chase in WODIs 👉 Ended Australia's 15-match winning streak in CWC#CWC25 Final 👉 #INDvSA | SUN, 2nd Nov, 2 PM! pic.twitter.com/8laT3Mq25P
— Star Sports (@StarSportsIndia) October 30, 2025
विजयानंतर काय म्हणाली जेमिमा
सामना जिंकल्यानंतर 'प्लेअर ऑफ द मॅच'चा किताब स्वीकारताना जेमिमा म्हणाली, 'मी येशूचे आभार मानू इच्छिते, कारण मी हे माझ्या बळावर करू शकले नसते. मी माझ्या आई, वडील, प्रशिक्षक आणि या संपूर्ण काळात ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्या सर्वांचे आभार मानू इच्छिते.' ती म्हणाली की, माझे बस एकच लक्ष्य होते. भारताला हा सामना जिंकवून देणे, कारण आम्ही अनेकदा अशा परिस्थितीत हार पत्करली होती.
शतकावर काय म्हणाली जेमिमा
जेमिमा म्हणाली की, आजचा दिवस माझ्या ५० किंवा १०० धावांबद्दल नव्हता. आजचा दिवस भारताला जिंकवून देण्याबद्दल होता. मला माहीत आहे की मला काही संधींवर नशिबाची साथ मिळाली, पण मला वाटते की देवाने सर्वकाही योग्य वेळी दिले.
बायबलमधील ओळी पुन्हा पुन्हा म्हणत होती...
जेमिमा म्हणाली की, सुरुवातीला मी फक्त लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत होते आणि स्वतःशी बोलत होते. पण शेवटी, मी... मी बायबलमधील एक ओळ पुन्हा पुन्हा म्हणत होते, कारण माझी ऊर्जा संपली होती, मी खूप थकून गेले होते. ती ओळ होती, 'फक्त स्थिर राहा, देव तुमच्यासाठी लढेल...' मी फक्त उभी राहिले. आणि त्यांनी (देवाने) माझ्यासाठी लढाई केली.

 
     
    




