नवी दिल्ली : भारतीय नौदल इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा गाठत, फेब्रुवारी २०२६ मध्ये आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे भव्य आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू (IFR) आयोजित करणार आहे. या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील, आणि नौदल ताफ्याचा आढावा घेतील, अशी माहिती नौदल अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हा कार्यक्रम अनेक दृष्टींनी ऐतिहासिक ठरणार आहे. कारण पहिल्यांदाच स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत आणि कलवरी श्रेणीतील अत्याधुनिक पाणबुड्या या भव्य संचलनात सहभागी होणार आहेत.
नौदल उपप्रमुख व्हाइस अॅडमिरल संजय वात्सायन यांनी सांगितले की, अमेरिका आणि रशिया या दोन देशांनी IFR या आंतरराष्ट्रीय नौदल सरावात सहभागासाठी नोंदणी केली आहे. दोन्ही देश त्यांच्या युद्धनौका आणि शक्य असल्यास काही लढाऊ विमाने देखील पाठवतील.
वात्सायन यांनी पुढे सांगितले की, सध्या ५५ हून अधिक देशांनी या आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू, मिलन सराव आणि हिंद महासागर नौदल संगोष्ठी (IONS) मध्ये सहभागी होण्यासाठी पुढाकार दाखविला आहे. “आम्ही अनेक देशांना आमंत्रणे दिली आहेत आणि आणखी सहभागी येण्याची अपेक्षा आहे,” असे ते म्हणाले.
‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू असूनही, भारताची परदेशी भागीदारी आणि नौदलाचे सहकार्य अखंडपणे सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. “भारत कोणत्याही आव्हानाला समर्थपणे तोंड देण्यास सज्ज आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हिंद महासागर क्षेत्रातील परिस्थितीवर भाष्य करताना वात्सायन म्हणाले, “सध्या सरासरी ४० ते ५० परदेशी जहाजे या प्रदेशात सक्रिय आहेत. आम्ही त्यांच्या प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवतो. ते कधी येतात, काय करतात आणि कुठे जातात हे सतत निरीक्षणात असते.”
नौदलाच्या वाढत्या सामर्थ्याबाबत ते म्हणाले की, या वर्षी १० युद्धनौका आणि एक पाणबुडी नौदलात सामील झाल्या आहेत. डिसेंबरपर्यंत आणखी चार जहाजे आणि पुढील वर्षभरात १९ नवीन जहाजे ताफ्यात दाखल होणार आहेत.
आगामी फ्लीट रिव्ह्यूमध्ये ‘मिलन’ बहुराष्ट्रीय नौदल सराव आणि ‘IONS’ परिषद हे दोन महत्त्वाचे कार्यक्रम देखील होणार आहेत. ‘मिलन’ हा पूर्व नौदल कमांडच्या नेतृत्वाखाली दर दोन वर्षांनी होणारा आंतरराष्ट्रीय सराव आहे. तर ‘IONS’ ही परिषद भारतीय नौदलाने २००८ मध्ये सुरू केली, ज्याद्वारे हिंद महासागर परिसरातील देशांमध्ये सागरी सहकार्याला चालना दिली जाते.
पहिली ‘IONS’ परिषद फेब्रुवारी २००८ मध्ये नवी दिल्ली येथे पार पडली होती, ज्याचे अध्यक्षस्थान भारताकडे होते. या सर्व उपक्रमांमुळे भारताची सागरी शक्ती, लष्करी भागीदारी आणि जागतिक स्तरावरची प्रतिष्ठा अधिक दृढ होणार आहे, असा विश्वास नौदल अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.