Friday, October 31, 2025
Happy Diwali

आई बनवा अन २५ लाख मिळवा,अशी अजब जाहिरात बघून त्यानं फोन केला आणि...

आई बनवा अन २५ लाख मिळवा,अशी अजब जाहिरात बघून त्यानं फोन केला आणि...

पुणे : विद्येचे माहेरघर अशी ओळख मिरवणाऱ्या पुण्यात एक धक्कादायक गुन्हा घडला आहे. हा सायबर फसवणुकीचा नवा आणि अजब असा प्रकार आहे.

मला आई बनवा आणि २५ लाख रुपये जिंका या भ्रामक जाहिरातीला बळी पडून एका कंत्राटदाराने फोन केला. या कंत्राटदाराने जाहिरातीला भुलून केलेल्या कृतीमुळे त्याची ११ लाख रुपयांची फसवणूक झाली. ही घटना बाणेर परिसरातली आहे. संबंधित व्यक्तीला सोशल मीडियावर 'एका महिलेला आई बनवण्यासाठी मदत केल्यास २५ लाख रुपये दिले जातील' अशी जाहिरात दिसली. त्या जाहिरातीत एक महिला, 'मी अशी व्यक्ती शोधतेय जी मला आई बनवेल, त्याचा रंग, शिक्षण, जात मला महत्त्वाचं नाही बाकी काही फरक पडत नाही.' असे नमूद होते. ही जाहिरात बघून कंत्राटदारी करणाऱ्या एका व्यक्तीने जाहिरातीतल्या नंबरवर फोन केला. समोरील व्यक्तीने महिलेबरोबर राहण्यासाठी, नोंदणीसाठी, ओळखपत्र आणि कायदेशीर प्रक्रिया आवश्यक आहे' असं सांगून कंत्रादाराकडून टप्याटप्प्याने पैसे उकळण्यास सुरुवात केली.

कधी रजिस्ट्रेशन फी, तर कधी वेरिफिकेशन, जीएसटी आणि सिक्युरिटी डिपॉझिटच्या नावाखाली ११ लाख रुपये गिळंकृत करण्यात आले. सुरवातीला गोड बोलणारे ठग नंतर पैसे उशिरा दिल्यास धमक्यांचा सूर लावत गेले. शेवटी कंत्राटदाराने संशय घेत प्रश्न विचारायला सुरुवात केली , तेव्हा समोरील माणसे ब्लॉक करून गायब झाली. फसवणूक लक्षात येताच कंत्राटदाराने बाणेर पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, तपास सुरू केला आहे.

सायबर गुन्हे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, 'प्रेग्नन्ट जॉब सर्विसेस' ही नवी संकल्पना नाही. याआधी २०२२ पासून 'प्रेग्नन्ट जॉब सर्विसेस' अंतर्गत देशभरात अशा फसवणुकीचे अनेक घडले आहेत. सोशल मीडियावर बनावट महिला प्रोफाइल, खोटे व्हिडीओ आणि आकर्षक जाहिरातींच्या माध्यमातून पुरुषांना फसवलं जातं. सुरुवातीला लहान रक्कम मागून विश्वास जिंकून घेतात नंतर मोठे व्यवहार करुन गायब होतात. अशा प्रकरणांची नोंद बिहार, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांत असून काही गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहेत.

Comments
Add Comment