 
                            हैदराबाद : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते मोहम्मद अझरुद्दीन यांनी तेलंगणा मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी राजभवन येथे अझरुद्दीन यांना शपथ दिली. अझरुद्दीन यांचा मंत्रिमंडळात समावेश करुन तेलंगणा सरकारने दीर्घकाळापासून रिक्त असलेली मंत्रिमंडळातील एक रिक्त जागा भरली. तसेच सरकारमध्ये मुसलमानांचे प्रतिनिधित्व करणारा एक चेहरा सहभागी करुन घेतला.
ज्युबिली हिल्स विधानसभा मतदारसंघात ११ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या मतदारसंघात ३० टक्के मुसलमान मतदार आहेत. या पार्श्वभूमीवर तेलंगणातील काँग्रेस सरकारने अझरुद्दीन यांचा मंत्रिमंडळात समावेश केला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
अझरुद्दीनने काँग्रेसच्या तिकिटावर ज्युबिली हिल्स विधानसभा मतदारसंघात २०२३ मध्ये निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत भारत राष्ट्र समितीच्या मगंती गोपीनाथ यांच्याकडून अझरुद्दीन यांचा पराभव झाला होता. पण मगंती गोपीनाथ यांचे ८ जून २०२५ रोजी निधन झाले. यामुळे रिक्त झालेल्या ज्युबिली हिल्स विधानसभा मतदारसंघात ११ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी वल्लाळ नवीन यादव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे त्याचवेळी अझरुद्दीन यांना काँग्रेसने मंत्री केले आहे. अझरुद्दीन सध्या आमदार नाही त्यामुळे शपथ घेतल्यापासून सहा महिन्यांत त्यांना आमदार व्हावे लागेल नाही तर मंत्रिपदावर पाणी सोडावे लागणार आहे. सत्ताधारी काँग्रेसने अझरुद्दीन यांच्या नावाची शिफारस विधान परिषदेच्या आमदारकीसाठी केली आहे. पण राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्याकडून शिक्कामोर्तब झालेले नाही.

 
     
    




