 
                            मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते आणि त्याचा फटका रस्ते वाहतुकीला बसतो. आता हीच वाहतूक सुरळीत राहावी म्हणून यावर मुंबई महापालिकेने एक उपाय शोधून काढलाय. पावसाळ्यात दरवर्षी मुंबई मधील अंधेरीतील सबवे जलमय होतो आणि वाहतूक विस्कळीत होते यावर उपाय म्हणून मुंबई महापालिकेने पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
अंधेरी सबवेला लागूनच मोगरा नाला वाहतो. उगम स्थळापासून ते सुमारे अडीच किलोमीटर अंतरात हा नाला वाहतो. विशेष म्हणजे या नाल्याचा प्रवाह उगम स्थळापासून अंधेरी साबवयकडे येताना तब्ब्ल १३ किलोमीटरचा उतार आहे. यामुळे नाल्यातील पाणी वेगाने वाहते. पावसाळ्यात नदीच्या पाण्याची पातळी वाढली की मोगरा नाल्यातून पाणी वेगाने वाहू लागते. यामुळे अंधेरीतला सगळा सखल भाग पाण्याखाली जातो. अंधेरी सबवे, दाऊद बाग, आझाद नगर या परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते.
पूर्व-पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा मार्ग
पश्चिम उपनगरातील अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणारा अंधेरी सबवे अंधेरी स्थानकाच्या जवळ आहे. गोखले पुलालगतचा हा मार्ग रेल्वे रूळाच्या खालून जातो.
अंधेरी सबवेवरूनच उड्डाणपूल
एकीकडे अंधेरी सबवे जलमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच, अंधेरी सबवेवरूनच उड्डाणपूल उभारणी करण्याचा पर्याय महापालिका पूल विभागाने निवडला आहे. वॉर्ड स्तरावरही याचे नियोजन करण्यात येणार आहे . सबवेवरून पूल होऊ शकतो का, त्याची लांबी किती असावी, त्याचे बांधकाम करताना येणाऱ्या अडचणी, खर्च, पुलाचा फायदा, रेल्वे प्रशासनासह विविध परवानगी याचा अहवाल तयार केला जाणार आहे. त्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यावर चर्चा सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

 
     
    




