Thursday, October 30, 2025
Happy Diwali

मराठवाड्यात सौदेबाजीचे प्रदर्शन

मराठवाड्यात सौदेबाजीचे प्रदर्शन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी महोत्सव नुकताच पार पडला. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक कार्यकर्त्यांनी महाविद्यालय स्तरावर शाखा स्थापन करण्यासाठी मोहीम राबविली; परंतु त्या मोहिमेला मराठवाड्यातून काही जिल्ह्यात विरोध झाला. काही विद्यार्थी संघटनांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्या मोहिमा बंद पाडण्याचा प्रयत्न केला. नांदेडमध्ये भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्या संस्थेतील एका प्रसिद्ध महाविद्यालयासमोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विद्यार्थी शाखेतर्फे विद्यार्थी संघटना वाढविण्यासाठी टाकलेला तंबू काही तासातच काढावयास लावण्यात आला. हा प्रकार कोणी केला? याचीही वरिष्ठांकडून चौकशी होणे आवश्यक आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरुद्ध मोठा मोर्चा काढला. या मोर्चातून विषारी टीका करण्यात आली. जातीपातीचे राजकारण करून फूट पाडण्याचा प्रकार मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या गोष्टीला समाजातील अनेकजण बळी देखील पडत आहेत. ही भविष्यात चिंतेची बाब मानली जात आहे. मराठवाड्यातील हा मोर्चा चर्चेचा विषय ठरला. शासनाविरुद्ध तसेच सत्ताधाऱ्याविरुद्ध जेव्हा-जेव्हा मोर्चा निघतो तेव्हा त्या मोर्चा मागे एक छुपी शक्ती असते. त्या छुप्या शक्तीचा शोध घेणे आवश्यक आहे. एकीकडे बच्चू कडू यांचे आंदोलन शेतकऱ्यांना सोबत घेऊन होत आहे. त्या आंदोलनात देखील मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांचा समावेश आहे. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांचे अनेक नेते त्या आंदोलनात सहभागी आहेत. शेतकरी, मराठा विरुद्ध ओबीसी असे आंदोलन उभारून काही राजकीय पक्ष स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

स्वतःच्या शक्तीचे प्रदर्शन करून अनेक नेते शासनासोबत सौदेबाजी करत असतात. हे प्रकार उघडपणे होत नसले तरी मुंबईत गेल्यावर थेट मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेच्या नावाखाली अशा प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो. नांदेडमध्ये देखील 'आरक्षण टिकविण्यासाठी सत्ता हातात द्या', असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले. त्यांच्यासमवेत ओबीसीचे लक्ष्मण हाके हे देखील उपस्थित होते. ओबीसींचा एल्गार मोर्चा या नावाखाली नांदेडमध्ये आंदोलन करण्यात आले. ओबीसी, भटके विमुक्त, बलुतेदार तसेच इतर मागासवर्गीय समन्वय समितीच्यावतीने नांदेडमध्ये मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र शासनाने २ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेला शासनादेश रद्द करावा, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. मागणी पूर्ण नाही झाली तर नागपूर किंवा मुंबईला मोठे आंदोलन उभारावे लागेल असे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यावेळी म्हणाले. ओबीसी समाजाला तेलंगणात ६२% आरक्षण लागू आहे. तर महाराष्ट्रात केवळ २७% च का? असा प्रश्न शासनाला विचारा अशी चिथावणीदेखील या आंदोलनातून देण्यात आली. मराठवाड्यात जेव्हा जेव्हा एखादा पक्ष राजकारण करू पाहतो त्यावेळेस तेलंगणाची सीमा लक्षात घेऊन तेथील उदाहरणे मराठवाड्यातील जनतेला दिली जातात. मराठवाड्यातील अनेक आंदोलनाला तेलंगणाची किनार असते.

तेलंगणा येथून काही छुपे हात मराठवाड्यात आंदोलनासाठी लागलेले असतात. अनेकदा तेलंगणातून रसद पुरवठा केल्यावर मराठवाड्यात आंदोलने होतात, असे दबक्या आवाजात बोलले जाते. यापूर्वीही तेलंगणातील माजी मुख्यमंत्री के. सी. आर यांनी मराठवाड्यात स्वतःचा पक्ष स्थापन केला होता; परंतु नंतर त्यांच्या पक्षाची हवाच निघून गेली. मुळात नांदेडचे असलेले; परंतु तेलंगणात स्थायिक झालेल्या काही मोठ्या व्यापाऱ्यांनी नांदेडला आंदोलनासाठी रसद पुरवठा केल्याचे सांगितले जात आहे. स्वतः आर्थिकदृष्ट्या भक्कम असल्याने केवळ एखाद्या पक्षाला उचकावून देण्याचे काम करण्यासाठी तसेच काही राजकीय पुढारी जवळ आहेत हे दाखविण्यासाठी व्यापारी मंडळींनी स्वतःचे हात मोकळे सोडले आहेत.

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीत आपली सत्ता यावी या उद्देशातून अनेक राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या निवडणुकीत आपली शक्ती दाखविण्याच्या उद्देशाने अनेक लहान-मोठे पक्ष कामाला लागले आहेत. लोकांना कशा पद्धतीने जमवायचे जेणेकरून आपल्या मागे मोठा मॉब आहे हे दाखविण्यासाठी शेतकरी, विद्यार्थी तसेच जातीपातीचे राजकारण समोर केले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांनी आपापल्या पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी कामाला लागा असा संदेश दिलेला आहे.

किंबहुना मराठवाड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दौरे वाढले आहेत. त्यांच्या दौऱ्यात अनेकजण अजित पवार गटात प्रवेश करीत आहेत. काँग्रेसमध्ये असलेले अनेकजण पक्ष सोडून त्यांच्या मागे जात आहेत, तर राष्ट्रवादीच्या काहींनी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. नांदेड जिल्ह्यात झालेले हे दोन्हीही नेत्यांचे पक्षप्रवेश सोहळे केवळ सत्तेतील अदलाबदलीसाठी झाल्याचे सांगितले जाते. येत्या महिन्याभरात मराठवाड्यात बऱ्याच उलथापालथी दिसून येतील. सत्ता मिळविण्यासाठी अनेकजण या पक्षातून त्या पक्षात उड्या मारत आहेत. पक्षप्रवेश सोहळे, आंदोलन व शक्तिप्रदर्शन या सर्वामागे स्वतःचे इप्सित साध्य करून घेणे हे एवढेच ध्येय काही पक्षांसमोर राहिले आहे, हे नाकारून चालणार नाही.

- डॉ. अभयकुमार दांडगे

Comments
Add Comment