Friday, October 31, 2025
Happy Diwali

डिसेंबर २०२८ नंतर सिग्नल फ्री आणि वाहतूक कोंडीशिवाय होणार प्रवास, महापालिकेच्या या प्रकल्पाची वाढतेय गती

डिसेंबर २०२८ नंतर सिग्नल फ्री आणि वाहतूक कोंडीशिवाय होणार प्रवास, महापालिकेच्या या प्रकल्पाची वाढतेय गती

मुंबई (खास प्रतिनिधी) : दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंडदरम्‍यान नवीन जोडमार्ग स्‍थापित होत आहे. पश्चिमेकडील मुंबई किनारी रस्ता ते मालाड माईंडस्‍पेस आणि थेट ऐरोलीला हा मार्ग जोडला जाणार आहे. कोणत्‍याही अडथळ्याशिवाय सिग्‍नल फ्री आणि वाहतूक कोंडीशिवाय थेट मालाड ते ऐरोलीदरम्‍यान प्रवास करणे सुलभ होणार आहे. पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगरे यामधील प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. मात्र, यासाठी डिसेंबर २०२८ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत, गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात, ५.३ किलोमीटर लांबी आणि तिहेरी मार्गिका असलेल्या जुळ्या बोगद्याच्या बांधकामासाठी ‘लॉन्चिंग शाफ्ट’चे उत्खनन कार्य जलद गतीने सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत भूमिगत जुळ्या बोगद्यांच्या बांधकामासाठी दोन अत्याधुनिक बोगदा खनन संयंत्रांची आवश्यकता आहे. यापैकी एका चे सर्व घटक भाग कार्यस्थळी दाखल झाले आहेत. ऑगस्‍ट २०२६ मध्‍ये बोगदा खोदकामास प्रत्‍यक्षात सुरूवात होणार आहे. या टप्प्यानंतर रस्‍ते प्रकल्पाच्या कामास अधिक गती मिळणार आहे. या जोड रस्‍ते प्रकल्पाची कामे निर्धारित कालमर्यादेतच पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे स्‍पष्‍ट निर्देश अतिरिक्‍त आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी दिले. मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणारा गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्प हा एकूण चार टप्प्यांमध्ये प्रस्तावित आहे. टप्पा ३ (ब) मध्ये गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे ५.३ किलोमीटर लांबीच्‍या, तिहेरी मार्गिका असलेल्‍या बोगद्यासाठी लॉन्चिंग शाफ्ट उत्खनन जलद गतीने सुरू आहे. अतिरिक्‍त आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी शुक्रवारी ३१ ऑक्‍टोबर २०२५ रोजी या कामाची प्रत्‍यक्ष स्‍थळ पाहणी केली. त्‍यावेळी त्‍यांनी विविध निर्देश दिले. महानगरपालिका अभियंते, सल्‍लागार यावेळी उपस्थित होते.

त्यानंतर बांगर यांनी ‘लॉन्चिंग शाफ्ट’चे उत्खनन कार्य सुरू असलेल्‍या ठिकाणास भेट दिली. या शाफ्टचे एकूण आकारमान अंदाजे २०० मीटर लांब, ५० मीटर रुंद आणि ३० मीटर खोल आहे. आतापर्यंत सुमारे १०० मीटर लांबी आणि ५० मीटर रुंदीच्या क्षेत्रात खोदकाम सुरू करण्यात आले असून, १० मीटर खोलीपर्यंतचे कार्य पूर्ण झाले आहे. खोदकाम खोलवर सुरू असून बाजूच्‍या भिंती खचू नयेत म्‍हणून 'रॉक ऍंकरिंग' केले जात आहे. सद्यस्थितीत आठवड्यातील सातही दिवस अहोरात्र म्‍हणजेच २४ तास काम सुरू आहे. याच गतीने युद्धपातळीवर कार्यवाही करून डिसेंबर २०२८ पर्यंत प्रकल्‍पाचे काम पूर्ण केले जाणार आहे.

बोगदा खनन संयंत्रांच्या सहाय्याने एकूण सुमारे ५.३ किलोमीटर लांबीपर्यंत दुहेरी बोगदयांचे खोदकाम करण्यात येणार आहे. पेटी बोगद्यासह हे एकूण अंतर सुमारे ६.६२ किलोमीटरपर्यंत वाढेल. प्रत्येक बोगद्याचा बाह्य व्यास सुमारे १४.४२ मीटर इतका असेल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हे बोगदे मुंबईतील आतापर्यंतचे सर्वात मोठे ठरतील, अशी माहिती संबंधितांकडून देण्यात आली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >