 
                            विरार, विराट नगर, ओस्वालनगरी नालासोपारा, अलकापुरी, उमेळमान या ठिकाणी रेल्वे उड्डाणपुलाचे नियोजन
मुंबई : वसई विरार महापालिका क्षेत्रातील १३ मुख्य रस्त्यांचे कॉक्रिटीकरण करण्याच्या कामास मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने गती द्यावी, असे निर्देश वन मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले.
कामास मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) वसई विरार महापालिका हद्दीत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पासंदर्भात मंत्री नाईक यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला. यावेळी एमएमआरडीएचे सहआयुक्त ए.के. पांडे, वसई विरार महापालिकेचे आयुक्त मनोज सुर्यवंशी, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, एमएमआरडीएचे मुख्य अभियंता यतिन साखळकर, महापालिकेचे कार्यकारी अभियंता प्रदीप पाचंगे आदी उपस्थित होते.
वसई विरार महापालिका क्षेत्रात एमएमआरडीएमार्फत तेरा मुख्य रस्त्यांच्या कॉक्रिटीकरणाचे काम करण्यात येत आहे. सिमेंटच्या रस्त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुलभ व जलदगतीने होणार आहे. त्यामुळे या कामास प्राधान्य देऊन लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे. तसेच महापालिका क्षेत्रातील उड्डाणपुलांची कामेही वेगाने कराव्यात, अशा सूचना मंत्री नाईक यांनी यावेळी दिल्या.
तसेच विरार, विराट नगर, ओस्वालनगरी नालासोपारा, अलकापुरी, उमेळमान या ठिकाणी रेल्वे उड्डाणपुलाचे नियोजन आहे. या रेल्वे उड्डाणपुलाचे काम एमएमआरडीएने लवकर सुरू करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

 
     
    




