Thursday, October 30, 2025
Happy Diwali

'या' दोन महत्वाच्या जागतिक घडामोडी शेअर बाजाराला दिशादर्शक ठरणार? गुंतवणूकदारांसाठीही या घडामोडी का महत्वाच्या?

'या' दोन महत्वाच्या जागतिक घडामोडी शेअर बाजाराला दिशादर्शक ठरणार? गुंतवणूकदारांसाठीही या घडामोडी का महत्वाच्या?

मोहित सोमण : आजचा दिवस शेअर बाजारासाठी महत्वाचा ठरणार आहे. युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिंगपींग यांची भेट दक्षिण कोरियात झाली आहे. याशिवाय कालच्या युएस फेडरल रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या बैठकीनंतर फेड गव्हर्नर जेरोम पॉवेल यांनी २५ बेसिस पूर्णांकाने (bps) व्याजदरात कपातीची घोषणा केली. या दोन घटनांमुळे शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात उत्साही वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने गेल्या दोन दिवसात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याने भारतीय शेअर बाजारातही संमिश्रित कल राहिला. गेल्या आठवड्यात युएसने ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) जाहीर केला होता. त्यात काहीशी घट झाल्याने किरकोळ दिलासा मिळाला असला तरी महागाईची (Inflation) शक्यता तज्ञांनी व्यक्त केल्यानंतर आगामी दिवसात महागाई, घटणारी रोजगार निर्मिती हे दोन प्रमुख कळीचे मुद्दे युएस बाजारात होते. अशातच युएस सरकारकडून दर कपातीचा मोठा दबाव जेरोम पॉवेल यांच्यावर अपेक्षित होतं असल्याचे म्हटले गेले. डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रशासन सातत्याने दरकपातीचा निर्णय घ्यावा यासाठी प्रयत्न करत होते. मात्र वेळोवेळी संबंधित परिस्थिती लक्षात घेता उपलब्ध आकडेवारीनुसारच दरकपातीचा निर्णय घेतला जाईल असे जेरोम पॉवेल म्हणाले होते. दरम्यान आगामी काळातील परिस्थिती लक्षात घेता मागील वेळी २५ बेसिस पूर्णांकाने दरकपात केली गेली होती. सलग दुसऱ्यांदा २५ बेसिस पूर्णांकाने कपात केली गेली आहे. युएस फेडरल रिझर्व्ह बँकेने १०:२ या बहुमताने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा दर ३.७५ ते ४% पातळीवर आला.

उपलब्ध माहितीनुसार, यावेळी फेडरल बँकेने युएस अर्थव्यवस्थेतील दृष्टीने काही महत्वाची पावले उचलली आहेत. बँकेने त्यांच्या मालमत्ता खरेदीमध्ये हळूहळू कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रक्रिया परिमाणात्मक असून युएस अर्थव्यवस्थेसाठी कडकपणा म्हणून ही पावले उचलली गेली.१ डिसेंबरपासून हे दर लागू होतील. त्यामुळेच आकडेवारीनुसार, आर्थिक क्रियाकलाप (Economic Acitivity) मध्यम गतीने वाढत आहेत.

फेड बैठकीत स्पष्ट केल्याप्रमाणे, या वर्षी युएसमधील नोकरीतील वाढ मंदावली आहे आणि बेरोजगारीचा दर वाढला आहे परंतु ऑगस्टपर्यंत तो कमीच राहिला आहे अलीकडील निर्देशक या घडामोडींशी सुसंगत आहेत असेही त्यात नमूद केले आहे, असे म्हटले आहे की,'वर्षाच्या सुरुवातीपासून महागाई वाढली आहे आणि ती आणखी काहीशी वाढलेली आहे.' काही विश्लेषक डिसेंबरमध्ये तसेच जानेवारीमध्ये कपातीचे भाकीत करत आहेत. बहुतांश तज्ञांनी पुन्हा एकदा दर कपातीचे संकेत भविष्यासाठी वर्तवले आहेत असे असताना भारतीय शेअर बाजार त्याला कसा प्रतिसाद देईल याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष केंद्रित असेल. विशेषतः गेल्या दोन सत्रात विदेशी गुंतवणूकदारांनी आपल्या पोर्टफोलिओतील गुंतवणूक काढणे सुरु केल्याने हा मुद्दा भारतीय शेअर बाजारात पुन्हा एकदा अधोरेखित होईल.दरम्यान, काही फेड अधिकाऱ्यांनी महागाईच्या जोखमींबद्दल सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे, तर काहींनी अमेरिकन नोकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी अधिक कपातीचे समर्थन केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महागाई स्थिर राहिली आहे आणि अमेरिकन मध्यवर्ती बँकेच्या २.० टक्के लक्ष्यापेक्षा खूपच जास्त आहे.

दुसरीकडे चीन व युएस यांच्यातील बैठक केवळ भूराजकीय दृष्टीने नव्हे तर दोन ताकदवान राष्ट्रांच्या हितसंबंधाने शेअर बाजाराला प्रेरित करेल. सुत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही देशांत सकारात्मक बोलणी झाली आहे. व्यापारविषयी, दुर्मिळ पृथ्वी वस्तू (Rare Earth Material) यांच्यावरील चीनकडून टाकलेल्या व्यापारी निर्बंधावर विस्तृत चर्चा झाल्याचे अपेक्षित आहे. अर्थात अमेरिका चीनवर अतिरिक्त टॅरिफ हटवेल का वाढवेल हे देखील स्पष्ट होणार आहे.

बैठक सुरू होण्यापूर्वी, ट्रम्प यांनी चीनसोबत करार 'शक्य' असल्याचे संकेत दिले होते. एका पत्रकाराने जेव्हा विचारले की आज करारावर स्वाक्षरी करण्याची अपेक्षा आहे का, तेव्हा ट्रम्प यांनी उत्तर दिले, 'होऊ शकेल. आपल्या सर्वांमध्ये चांगली समज आहे' चर्चेदरम्यान,शी यांनी एका अनुवादकाद्वारे ट्रम्प यांना सांगितले की, दक्षिण कोरियाच्या बुसान शहरात झालेल्या बैठकीत दोन्ही देशांच्या व्यापार वाटाघाटीकर्त्यांनी एका करारावर मूलभूत समजूत काढली आहे. चीनच्या वृत्तसंस्थेनुसार, चीनचा विकास ट्रम्पच्या 'अमेरिकेला पुन्हा महान बनवण्याच्या ध्येयाशी सुसंगत आहे' असेही त्यांनी सांगितले.

२०१९ नंतर पहिल्यांदाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आमनेसामने येत असल्याने जागतिक बाजारपेठांचे लक्ष आज दक्षिण कोरियावर आहे. पण दोन्ही देशातील‌‌ ठोस निर्णय न झाल्यास अमेरिका चिनी वस्तूंवर नवीन शुल्क आकारण्याचा विचार करत आहे, ज्यामुळे बाजारपेठा अडचणीत आहेत त्यामुळे या दोन्ही आगामी घडामोडीवर बाजार कसा व्यक्त होत यावर उर्वरित ठोकताळे अवलंबून असतील. कालच्या निर्णयानंतर युएस बाजारातील एस अँड पी निर्देशांक सपाट पातळीवर स्थिरावला असला तरी डाऊ जोन्स (०.२०%),नासडाक (०.५५%) अंकाने उसळले होते. आशियाई बाजारातही संमिश्रित प्रतिसाद कायम आहे.

या नव्या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना IndiaBonds.com सह संस्थापक विशाल गोयंका म्हणाले आहेत की,'अमेरिकन फेडने अपेक्षेप्रमाणे रात्रीच्या वेळी बेंचमार्क दरांमध्ये २५ बीपीएसची कपात केली. तथापि, गव्हर्नर पॉवेल यांनी अगदी स्पष्टपणे अधोरेखित केले की पुढील डिसेंबरच्या बैठकीत आणखी कपात करणे हा पूर्ण झालेला करार नाही. अमेरिकन सरकारच्या शटडाऊनमुळे प्रकाशित आर्थिक डेटाच्या अभावामुळे त्यांची निर्णय प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची आहे.

डिसेंबरच्या सुरुवातीला होणाऱ्या पुढील बैठकीत आरबीआयला रेपो दरात कपात करण्यासाठी हा स्पष्ट संकेत आहे. त्यांचे शेवटचे धोरण एक विराम म्हणून परिभाषित केले गेले होते आणि दीर्घकालीन सरकारी उत्पन्नाचा विस्तार करून त्यांनी बाजारपेठांवर नेमके हेच केले. तथापि, बँकिंग क्षेत्रातून येणा-या पूर्वीच्या दर कपातीचे योग्य प्रसारण करण्यासाठी, एक सपाट आणि कमी दीर्घकालीन उत्पन्न वक्र आवश्यक आहे. अमेरिकेतील दर कपातीसह, आरबीआय देखील त्याच दिशेने वाटचाल करेल आणि दीर्घकालीन सरकारी रोखे आकर्षक दिसतील अशी अपेक्षा आहे.'

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >