मुंबई (खास प्रतिनिधी) : मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याची विल्हेवाट लावून जमिन पुनर्प्राप्त करून देण्याच्या कामाला आता गती देण्यात येत आहे. या प्रकल्पाचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र, ही जागा मोकळी झाल्यानंतर याठिकाणी कोणतेही बांधकाम केले जाणार नसून ही जागा धारावी विकास प्रकल्प कामांसाठी कास्टींग यार्ड म्हणून दिले जाणार आहे. या कास्टींग यार्ड करता संबंधित कंपनीकडून महापालिकेला वर्षाला २० कोटींहून अधिक रुपयांचा महसूल प्राप्त होणार आहे.
मुंबई महापालिकच्यावतीने मुलूंडमधील कचऱ्यावर या शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी बायो-मायनिंग प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. ऑक्टोबर २०१९ पासून हा प्रकल्प कार्यरत असून याठिकाणी आतापर्यंत ४.८१ दशलक्ष मेट्रिक टन म्हणजे ६८.७७ टक्के कचऱ्यावर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
मुलुंड क्षेपणभूमीवरील कचरा निष्कासित करुन मूळ जागा पुनर्प्राप्त करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. याच अनुषंगाने,महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीनेमुलुंड येथील क्षेपणभूमीवरील सुमारे ७ दशलक्ष मेट्रिक टन कचऱ्यावर योग्य प्रक्रिया करुन त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी बायो-मायनिंग प्रकल्प राबविला जात आहे. कचऱ्यातील माती,ज्वलनशील पदार्थ तसेच राडारोडा किंवा दगडासारख्या घटकांचे वर्गीकरण करुन त्यावर याठिकाणी प्रक्रिया केली जाते. यंदा २१ मे रोजी पाऊस पडल्याने नियोजित वेळेपूर्वीच या प्रकल्पाचे काम थांबवण्यात आले होते. परंतु आता पावसाळा संपल्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात करण्यात आली आहे. परंतु अधून मधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने या कामांतही विलंब होत आहे. त्यामुळे प्रत्यक्षात या बायो मायनिंग प्रकल्पांचे काम मार्च अथवा जून २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
मुलुुंड डम्पिंग ग्राऊंडची जागा मोकळी करण्यात आल्यानंतर ही जमिन धारावी प्रकल्पासाठी अदानी कंपनीला देण्यात येणार असून यावर धारावीतील नागरिकांसाठी घरे बांधली जातील अशाप्रकारची चर्चा आहे. मात्र, नियमानुसार कचरा भराव भूमी अर्थात डम्पिंग ग्राऊंडसाठी दिलेल्या जमिनीवर कधीही इमारत बांधकाम करता येत नाही. अशाप्रकारच्या जमिनीवर पुन्हा हिरवळ राखणे आवश्यक असते. त्यामुळे धारावी विकास प्रकल्पासाठी ही जमिनी देता येणार नसल्याने या प्रकल्पासाठी कास्टींग यार्ड म्हणून या जागेचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. मुलुंड डम्पिंग ग्राऊंडच्या या जागेचा वापर धारावी विकास प्रकल्पासाठी कास्टींग यार्डकरता केला जाणार असल्याने यासाठी संबंधित कंपनीला शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे वर्षाला सुमारे २० कोटी रुपयांचे शुल्क आकारण्याचा विचार महापालिका प्रशासनाचा असल्याची माहिती मिळत आहे






