मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. सेप्टिक इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांची तब्येत बिघडली आहे. त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वैद्यकीय खर्च वाढल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी आता आर्थिक मदतीसाठी आवाहन केलं आहे.
८६ वर्षीय सुधीर दळवी यांना ८ ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांच्यावर उपचार सुरू असले तरी प्रकृती अजूनही नाजूक आहे. उपचारासाठी अंदाजे १५ लाख रुपयांची गरज असल्याने सोशल मीडियावर त्यांच्या मदतीसाठी मोहिम राबवली जात आहे.
सुधीर दळवी यांचं नाव ऐकलं की लगेच आठवतो तो ‘शिर्डी के साईं बाबा’ या चित्रपटातील साईबाबांचा शांत, करुणामय चेहरा. या भूमिकेमुळे त्यांनी देशभरात लोकप्रियता मिळवली. त्यांच्या अभिनयात दिसणारी आध्यात्मिक गूढता आणि भावनिक खोली आजही प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत.
चित्रपटांसोबतच त्यांनी ‘हम लोग’, ‘कबीर’, ‘रामायण’ अशा हिंदी मालिकांमध्ये आणि ‘विधिलिखित’, ‘ऐकावं ते नवल’, ‘देवता’, ‘घर संसार’ सारख्या मराठी चित्रपटांमध्येही अविस्मरणीय भूमिका साकारल्या. चार दशकांहून अधिक काळ अभिनय क्षेत्रात कार्यरत राहून त्यांनी एक आदर्श कलाकार म्हणून ओळख निर्माण केली.
वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांच्या मते सेप्टिक इन्फेक्शन (सेप्सिस) ही शरीरातील संसर्गावर होणारी धोकादायक प्रतिक्रिया आहे. यात शरीराची रोगप्रतिकारक शक्तीच स्वतःच्या अवयवांवर हल्ला करते, ज्यामुळे रुग्णाची स्थिती अत्यंत गंभीर होऊ शकते.