Thursday, October 30, 2025
Happy Diwali

प्रसिद्धी, पैसा आणि नावापासून दूर जाऊन ही प्रसिद्ध अभिनेत्री जगतेय संन्यासी आयुष्य!

प्रसिद्धी, पैसा आणि नावापासून दूर जाऊन ही प्रसिद्ध अभिनेत्री जगतेय संन्यासी आयुष्य!

मुंबई : अभिनय क्षेत्रात प्रसिद्धी आणि यश मिळवणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. त्यासाठी काही कलाकार मोठा संघर्ष, त्याग आणि आयुष्यभर मेहनत करत असतात. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आपली अमीट छाप सोडतात. परंतु एकीकडे या क्षेत्रात झगमगाट, प्रसिद्धी आणि स्पर्धा यांचं प्रचंड आकर्षण असलं तरी, गेल्या काही वर्षांत अनेक कलाकारांनी या चकाकीच्या दुनियेपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. करिअरचा त्याग करून त्यांनी शांतता, साधना आणि अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे. काहींनी तर पूर्णपणे संन्यास घेऊन आपलं जीवन देवाधर्म आणि साधनेत व्यतीत करण्याचा संकल्प केला आहे.

अशीच एक अभिनेत्री म्हणजे नुपूर अलंकार जिच्या अभिनयाने छोट्या पडद्यावर आपली खास ओळख निर्माण केली होती, पण आता ती पूर्णपणे संसार आणि ग्लॅमरपासून दूर, संन्यासी जीवन जगत आहे.

नुपूर अलंकारने तब्बल १५० हून अधिक टीव्ही मालिकांमध्ये काम केले असून, ती एकेकाळी टेलिव्हिजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री मानली जायची. २०२२ मध्ये तिने अभिनय क्षेत्राचा कायमचा निरोप घेत संन्यासाचा मार्ग स्वीकारला. तिच्या गुरु शंभू शरण झा यांच्या मार्गदर्शनाखाली तिने संन्यास घेतला आणि त्यानंतर ती पूर्णपणे आध्यात्मिक जीवनात रमली आहे. आज ती ना टीव्ही शोमध्ये दिसते, ना कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होते.

एका मुलाखतीत नुपूर म्हणाली होती, “आता माझ्या आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या नाटकासाठी जागा नाही. ही इंडस्ट्री दिखाव्याने भरलेली आहे. आता मी या सगळ्यापासून दूर जाऊन खरी शांतता अनुभवते.” सध्या ती भगवे कपडे घालून, भिक्षा मागून आपलं पोट भरते, दिवसातून फक्त एकदाच जेवते आणि जमिनीवर झोपते. तिचं म्हणणं आहे, “जर भिक्षा मागून खाल्लं नाही, तर मी संन्यासिनी कसली?”

नुपूरच्या पतीने तिच्या या निर्णयाचा आदर करत तिला लग्नाच्या बंधनातून मुक्त केलं. विवाहबंधनात २० वर्षे घालवल्यानंतर नुपूरने पूर्ण वैराग्य स्वीकारलं. आज ती आपला संपूर्ण वेळ साधना आणि ध्यानात व्यतीत करते.

अभिनयाच्या क्षेत्रात नुपूरने ‘दीया और बाती हम’, ‘शक्तिमान’, ‘घर की लक्ष्मी बेटियां’, ‘सांवरिया’, ‘राजाजी’ यांसारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं. तब्बल २७ वर्षांचा अभिनय प्रवास मागे ठेवून तिने ग्लॅमर वर्ल्डचा त्याग केला आणि साधेपणाचं आयुष्य स्विकारलं.

एकेकाळी टेलिव्हिजनच्या पडद्यावर राज्य करणारी ही अभिनेत्री आज आत्मशांती आणि अध्यात्माच्या मार्गावर चालत आहे. तिचा हा बदल अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Comments
Add Comment