Thursday, October 30, 2025
Happy Diwali

धक्कादायक! एसटीचे ७ कर्मचारी दारू पिऊन ड्युटीवर!

धक्कादायक! एसटीचे ७ कर्मचारी दारू पिऊन ड्युटीवर!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कारवाईचा बडगा

मुंबई : अचानक केलेल्या तपासणीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे काही कर्मचारी दारूच्या नशेत काम करताना आढळले. प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अशा कृत्यांविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ धोरण अवलंबले जाईल आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज (गुरुवारी) स्पष्ट केले.

मंत्री सरनाईक यांच्याकडे कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनाच्या अनेक तक्रारी आल्यानंतर, त्यांनी तातडीने सुरक्षा आणि दक्षता विभागाला नशेत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मोठे अभियान सुरू करण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार, एसटी महामंडळाने मंगळवारी राज्यभरातील सर्व विभागांमध्ये अचानक व्यापक तपासणी मोहीम राबवली.

या अचानक तपासणीत ७१९ चालक, ५२४ वाहक आणि ४५८ यांत्रिकी कर्मचाऱ्यांसह एकूण १७०१ कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. अखेरीस, कर्तव्यावर दारूचे सेवन केल्याप्रकरणी एकूण सात कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. धुळे (१ यांत्रिकी, १ क्लिनर, १ चालक), नाशिक (१ चालक), परभणी (१ यांत्रिकी), भंडारा (१ यांत्रिकी) आणि नांदेड (१ वाहक) येथील कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.

मंत्री सरनाईक यांनी इशारा दिला आहे की, भविष्यात असे गैरकृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि यापुढेही अचानक तपासण्या सुरू राहतील. तसेच, भविष्यात येणाऱ्या नवीन एसटी बसेसमध्ये चालकांच्या सीटजवळ श्वास विश्लेषक उपकरणे बसवण्यात येतील, ज्यामुळे दारू पिऊन गाडी चालवण्यास प्रतिबंध होईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा