Thursday, October 30, 2025
Happy Diwali

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एक अनोखी आणि खळबळजनक युती केली आहे.

१२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) निवडणुकीच्या निमित्ताने या बहुचर्चित निवडणुकीत महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीमध्ये थेट लढत अपेक्षित असताना, क्रिकेटच्या मैदानात 'राजकारण नको' या भूमिकेतून या दोन्ही मातब्बर नेत्यांनी आपल्याच सहकाऱ्यांची कोंडी करण्याची रणनीती आखल्याचे समोर आले आहे.

एमसीएच्या या निवडणुकीला मोठे महत्त्व आहे, कारण या संस्थेचे वार्षिक अंदाजपत्रक सुमारे २०० कोटी रुपये आणि स्थावर मालमत्ता जवळपास ७०० कोटी रुपयांची आहे. त्यामुळेच, प्रत्येक पक्ष आणि नेत्याचा आपला उमेदवार संघटनेत असावा, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. निवडणुकीसाठी उमेदवारांची अंतिम यादी ७ नोव्हेंबर रोजी निश्चित होणार आहे.

या निवडणुकीत राज्यातील अनेक सर्वपक्षीय बडे नेते मतदार म्हणून सहभागी आहेत. यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, रवींद्र चव्हाण यांच्यासह आशिष शेलार, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, नाना पटोले, मिलिंद नार्वेकर, जितेंद्र आव्हाड, सचिन अहिर, प्रताप सरनाईक, विश्वजीत कदम, विहंग सरनाईक यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, एकाच पक्षात असलेले नेते इथे एकमेकांना शह देण्याच्या तयारीत आहेत, तर राजकीय विरोधक मात्र पडद्याआड एकत्र येत आहेत.

एमसीएच्या या निवडणुकीवर प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांची स्पष्ट छाप दिसत आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे नाव पुढे केले आहे. तर, दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट फडणवीस यांची भेट घेऊन, आपले पुत्र विहंग सरनाईक यांच्यासाठी शब्द टाकला. विहंग यांच्यासाठी सरनाईक यांनी यापूर्वी शरद पवार यांचीही भेट घेतली होती. उद्धव ठाकरे यांनीही आपले निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांच्यासाठी पवार यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनीही विहंग आणि इतर सदस्यांची वर्णी लागावी यासाठी स्वतंत्रपणे रणनीती आखली आहे.

या सगळ्या राजकीय घडामोडींदरम्यान, भाजपचे नेते प्रसाद लाड यांनीही मतजुळवणीसाठी पुढाकार घेतला आहे. सर्वात मोठी राजकीय चर्चा अशी आहे की, फडणवीस आणि पवार यांनी अध्यक्षपदासाठी ज्या नावावर चाचपणी केली आहे, त्याला महायुतीमधीलच काही नेत्यांकडून प्रखर विरोध होत आहे. मात्र, या नेत्यांचा आग्रह धुडकावला जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

विशेष बाब म्हणजे, सत्ताधाऱ्यांचा विरोध असलेल्या विरोधी पक्षातील सदस्यालाही या युतीमुळे मदत मिळणार आहे, आणि ज्या पक्षाचा राज्यात एकही आमदार नाही, त्या पक्षाशी संबंधित उमेदवारालाही सदस्यत्वाचा मान मिळण्याची शक्यता आहे.

या वाढत्या राजकीय हस्तक्षेपावर भाष्य करताना, शरद पवार यांनी बुधवारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी स्पष्ट केले की, एमसीए निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप वाढणे चुकीचे आहे. अध्यक्षपदाची धुरा केवळ खेळाशी संबंधित व्यक्तीकडेच सोपवावी, अशी अपेक्षा क्लब सदस्य आणि खेळाडूंनीही व्यक्त केली.

पवार पुढे म्हणाले, "मी कधीच एमसीएमध्ये राजकारण आणले नाही, हीच अपेक्षा मला आतादेखील आहे. आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी क्रिकेटमध्ये राजकारण केले नाही आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील क्रिकेटच्या मैदानात राजकारण करणार नाहीत आणि ते क्रिकेटच्या बाजूने उभे राहतील." या शब्दांत त्यांनी फडणवीसांचे कौतुक केले आणि क्रिकेटच्या क्षेत्रात राजकारणाचे जोडे बाजूला ठेवले पाहिजेत, या भूमिकेचा पुनरुच्चार केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा