गृहमंत्री शहा आणि नड्डा यांचा बिहारच्या मतदारांना इशारा
पाटणा: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज बिहारमधील मतदारांना आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पुन्हा निवडून देण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ही निवडणूक बिहारला ‘जंगलराज’ पासून वाचवण्यासाठी आहे.
शहा यांनी मतदारांना इशारा दिला की, लालू-राबडींचे ‘जंगलराज’ नवीन नावाने आणि नवीन रूपात बिहारच्या दारावर परत आले आहे. एक छोटीशी चूक राज्याला २० वर्षांनी मागे नेऊ शकते.
नालंदा आणि मुंगेर जिल्ह्यात प्रचारसभांना संबोधित करताना शहा म्हणाले, "६ नोव्हेंबरला मतदान आहे. तुम्ही केवळ आमदार-मंत्री निवडण्यासाठी मतदान करत नाही आहात, तर नितीश कुमार आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली बिहारचा विकास होण्यासाठी मतदान करत आहात. तुमचे प्रत्येक मत जंगलराज थांबवण्यासाठी आहे."
शहा यांनी आरोप केला की, लालू-राबडी आणि काँग्रेस बिहारचे कल्याण करू शकत नाहीत. त्यांनी लालू-राबडी यांच्या राजवटीत उद्योगांना लागलेले टाळे, खून आणि खंडणीसाठी झालेले अपहरण यांसारख्या घटनांची आठवण करून दिली. तसेच, त्यांनी भाजपवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून काँग्रेसवर टीका केली.