नवी दिल्ली : अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिराचे (Ram Janmabhoomi Temple) अपूर्ण राहिलेले काम अलीकडेच पूर्ण झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. या निमित्ताने मंदिरावर ध्वजारोहण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या २५ नोव्हेंबर २०२५ रोजी अयोध्येत येत आहेत. यापूर्वी २२ जानेवारी २०२४ रोजी भव्य राम मंदिराचे लोकार्पण करण्यात आले होते. तसाच भव्य सोहळा २५ नोव्हेंबर २०२५ रोजी पुन्हा एकदा आयोजित करण्यात येणार आहे. राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या सोहळ्यासाठी सुमारे ८ हजार निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. या सोहळ्याच्या दिवशी, म्हणजेच २५ नोव्हेंबर रोजी, सामान्य भाविकांसाठी रामललाचे दर्शन बंद राहणार आहे. या समारंभात केवळ निमंत्रित पाहुण्यांनाच मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी असेल, तशी व्यवस्था केली जात आहे. या सोहळ्याच्या दुसऱ्या दिवसापासून, म्हणजेच २६ नोव्हेंबरपासून, राम मंदिरात सामान्य भाविकांसाठी पुन्हा एकदा रामललाचे दर्शन सुरू होणार आहे.
अमेरिका: रशियाने नुकतेच 'पोसायडन' नावाच्या आण्विक-शक्तीवर चालणाऱ्या अंडरवॉटर ड्रोनची चाचणी यशस्वी केल्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर ट्रम्प ...
राम जन्मभूमी संकुलातील सर्व मंदिरे वर्षाच्या अखेरीस खुली होणार
राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी अयोध्या संकुलाच्या भविष्यातील योजनांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट या संपूर्ण भागात सुरक्षा तपासणीशिवाय भाविकांना मुक्तपणे फिरता येईल का, याचा विचार करत आहे. येथे बांधलेली प्रत्येक गोष्ट भक्तांना समर्पित असावी, असा ट्रस्टचा सतत प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, या वर्षाच्या अखेरीस श्रीराम जन्मभूमी संकुलातील सर्व मंदिरे, उद्याने आणि कुबेर टीला हे परिसर भाविकांसाठी खुले करण्याचा ट्रस्टचा प्रयत्न असेल. यामुळे रामभक्तांना लवकरच संपूर्ण परिसर पाहण्याची संधी मिळणार आहे.
२५ नोव्हेंबरला राम मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण
पुढे मिश्रा यांनी स्पष्ट केले की, मंदिराच्या काही भागांमध्ये मर्यादित संख्येनेच लोकांना भेट देता येईल. उदाहरणार्थ, कुबेर टीला येथे एकावेळी कमी संख्येने भाविक येऊ शकतील. तसेच, राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावरील राम दरबारातील भाविकांची संख्याही मर्यादित असेल. ट्रस्ट प्रत्येक जबाबदारीत पूर्णपणे गुंतलेला असून, त्यांचे प्रयत्न आहेत की, बांधकाम शक्य तितक्या लवकर पूर्ण करावे. ते म्हणाले, "ट्रस्टने आमच्यावर सोपवलेले बांधकाम काम पूर्ण झाले आहे, ही माहिती भक्तांना कळवावी, यासाठी आमचे प्रयत्न आहेत." मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्याच्या घोषणेचा भाग म्हणून, २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर (Shikhar) ध्वजारोहण (Flag Hoisting) केले जाईल. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम दरबारात आरती
अयोध्या राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर, २५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. ट्रस्ट संचालकांनी या दिवशीच्या कार्यक्रमाची माहिती दिली आहे. मुख्य मंदिराच्या आसपास असलेल्या सहा मंदिरांवर ध्वजदंड व कलश स्थापन करण्यात आले आहेत. तसेच, महर्षी वाल्मिकी, वशिष्ठ, विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, निषादराज, शबरी आणि अहिल्या यांच्यासाठी समर्पित असलेले 'सप्त मंडप' मंदिराचे कामही पूर्ण झाले आहे. मुख्य मंदिराच्या आसपास भगवान शिव, भगवान गणेश, भगवान हनुमान, सूर्यदेव, देवी भगवती आणि देवी अन्नपूर्णा या देवतांची मंदिरेही पूर्ण झाली आहेत. मंदिराच्या पहिल्या मजल्यावर 'राम परिवार' आसनस्थ झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे बसून आरती करणार आहेत. त्यानंतर त्यांच्या हस्ते मंदिराच्या शीर्षस्थानी ध्वजारोहण केले जाईल. राम मंदिर निर्माणाव्यतिरिक्त, भाविकांसाठी पूजा-प्रार्थनेची सोय, फुटपाथ, दर्शनाचा भाग आणि भाविकांचा ओघ नियंत्रित करण्याच्या व्यवस्था पूर्ण करण्यात आल्या आहेत. तसेच, १० एकरचा 'पंचवटी' भाग देखील जवळपास पूर्णत्वास आला आहे.