मुंबई (खास प्रतिनिधी) : कोस्टल रोड (उत्तर)ला जोडल्या जाणाऱ्या अतिरिक्त पुलाच्या जोडणीचे काम मागील दीड वर्षांपासून केवळ अनधिकृत झोपड्यांनी अडवून ठेवले होते. अखेर अंधेरी पश्चिम येथील एस व्ही पटेल रोडवरील अनधिकृत झोपड्यांवर जिल्हाधिकारी आणि महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या जोड2 रस्त्याचे काम पुढील दोन वर्षांमध्ये होईल आणि यामुळे लोखंडवाला आणि सात बंगला परिसरात जाणाऱ्या लोकांचा प्रवास सुकर होईल तसेच सध्या जे.पी. रोडवर होणाऱ्या वाहतूक कोंडीची समस्या कायमचीच निकालात निघेल.
अंधेरी पश्चिम येथील सरदार वल्लभभाई पटेल नगर परिसरातील विस्तारीत कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामात तब्बल ४७ झोपड्या तसेच इतार बांधकामे अडथळा येत होती. ही बांधकाम सीआरझेड जागेत येत होती आणि ही जागा जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारित येत आहे. मात्र,या अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करण्यात न आल्याने या जोड रस्त्याचे काम मागील दीड वर्षांपासून अडकून पडले होते.
मात्र,आता महापालिकेच्यावतीने उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार केल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाने महापालिकेच्या मदतीने या सर्व बांधकामावर गुरुवारी धडक कारवाई केली. ही बाधकामे हटवण्यात आल्याने या जोड रस्त्याच्या कामांना गती मिळणार असून आता या जोड रस्त्याचे काम पुढील दोन वर्षांमध्ये पूर्ण होईल असा विश्वास महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. सरदार वल्लभभाई पटेल नगरमधून विकास नियोजित रस्ता जात असून हा रस्ता आता अतिरक्त जोड रस्ता ठरणार आहे.






