अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन एका सरकारी प्रकल्पाला प्रोत्साहन देत असल्याचा एक खोटा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात गुंतवणुकीवर असामान्यपणे जास्त परतावा मिळण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
या व्हिडीओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, २१,००० रुपयांची गुंतवणूक केल्यास दरमहा १५ लाख रुपये मिळू शकतात.
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट-चेकिंग टीमने या व्हिडीओची सत्यता तपासली असून तो डिजिटल पद्धतीने बदललेला आणि पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे.
"अर्थमंत्री किंवा भारत सरकारने अशी कोणतीही योजना सुरू केलेली नाही किंवा त्याचे समर्थन केलेले नाही," असे पीआयबीने म्हटले आहे. नागरिकांनी अशा संशयास्पद गुंतवणूक योजनांना बळी पडू नये आणि कोणतीही माहिती अधिकृत स्त्रोतांकडून तपासून घ्यावी, असे आवाहन अर्थ मंत्रालयाने केले आहे.