मुंबई: मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनात भर घालण्यासाठी मराठीतील दैनंदिन मालिका महत्त्वाची भूमिका निभावतात. वेगवेगळ्या विषयांच्या कथांमधून खास करून महिला वर्गाचे मनोरंजन करण्यासाठी सायंकाळी ७ ते १० हा वेळ हक्काचा असतो. त्यामुळे भावनिक पातळीवर स्पर्श करणाऱ्या कथा सादर करण्यासाठी कलर्स मराठीवर अजून एका नव्या मालिकेची भर पडणार आहे. ‘बाईपण जिंदाबाद’ या मालिकेच्या यशानंतर आता त्याच मालिकेच्या साखळीतून प्रेक्षकांसमोर ‘मच्छीका पानी’ ही नवी मालिका भेटीला येणार आहे.
स्त्रीच्या असंख्य रूपांना, तिच्या संघर्षाला आणि तिच्या सामर्थ्याला सलाम करणारी ‘बाईपण जिंदाबाद’ ही मालिका प्रत्येक स्त्रीच्या आयुष्याचे वास्तव आणि भावविश्व दाखवणारी ठरली आहे. ‘मच्छीका पानी’मध्येही हाच प्रवाह पुढे नेत दोन भिन्न पण तितक्याच प्रेमळ आणि सशक्त आईंची कथा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. या नव्या मालिकेतून सुचित्रा बांदेकर अनेक दिवसांनी छोट्या पडद्यावर दिसणार आहेत.
सुचित्रा बांदेकर या मालिकेत एका करिअर-ड्रिव्हन, स्वतंत्र आणि स्वप्नाळू आईची भूमिका साकारत आहे. जिचं ध्येय आहे आपल्या वडिलांच्या आयकॉनिक हॉटेलचे पुनरुज्जीवन करणे, आणि हे स्वप्न ती आपल्या मुलाने पूर्ण करावे अशी तिची मनापासूनची इच्छा आहे. यात सुचित्रा यांच्या मुलाची भूमिका तेजस बर्वे करत आहे. ज्याला स्वतःच्या इच्छा असून आईच्या स्वप्नांमध्ये तो अडकलेला आहे.
नेरळ : मध्य रेल्वे प्रशासनाने नेरळ-माथेरान दरम्यानची बहुप्रतिक्षित मिनी ट्रेन सेवा पुन्हा सुरू करण्याबद्दल माहिती दिली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने ...
दुसऱ्या बाजूला, शलाका पवार दिसणार आहे एका उत्साही, मनमोकळ्या आणि दृढनिश्चयी कोळी स्त्रीच्या भूमिकेत. समुद्राच्या लाटांसारखं तिचं मनही विशाल आणि प्रामाणिक आहे. ती आपल्या मुलाने पारंपरिक मच्छीमार व्यवसाय पुढे न्यावा अशी अपेक्षा बाळगते. मात्र तिच्या मुलाला फूड इन्फ्लुएन्सर बनायचे असून कोळीन बायच्या मुलाची भूमिका विनायक माळी करत आहे.
अशाप्रकारे दोन वेगळ्या विचारांच्या बायांची नवी केमिस्ट्री मालिकेत पाहायला मिळणार आहे. ही मालिका रविवार, २ नोव्हेंबरपासून रात्री ८ वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.