Wednesday, October 29, 2025
Happy Diwali

‘आंदोलन कायम ठेऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार’- बच्चू कडू

‘आंदोलन कायम ठेऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार’- बच्चू कडू

मुंबईला जाऊन मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार

नागपूर : कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वात नागपुरात सुरू असलेल्या आंदोलनात आज, बुधवारी रात्री मोठी घडामोड घडली. शासनाच्या प्रतिनिधींशी प्राथमिक चर्चा केल्यानंतर रात्री 9.30 वाजता कडू यांनी आंदोलन कायम ठेऊन मुंबईत गुरुवारी मुख्यमंत्र्यांशी चर्चेची तयारी दाखवली आहे. नागपुरात बच्चू कडू, राजू शेट्टी, कॉ. अजित नवले, महादेव जानकर आणि इतर शेतकरी नेत्यांसह शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलकांनी मंगळवारी नागपूर- हैदराबाद महामार्ग 44 रोखून धरल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. याप्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वतःहून (सुमोटो-कॉग्निजन्स) दखल घेत बुधवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत रस्ता मोकळा करून गुरुवारी सकाळी 11 वाजेपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आंदोलकांनी रस्ता मोकळा करत कॉटन फेडरेशनच्या शेजारी असलेल्या मैदानावर ठिय्या मांडला. याठिकाणी संध्याकाळी 6 वाजता बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी राज्यमंत्री पंकज भोयर आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल दाखल झाले. राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सरकारच्या वतीनं आपल्याला नम्र विनंती करायला आलो आहे. सरकार आपल्यासोबत चर्चा करायला तयार आहे. चर्चेच्या माध्यमातून मार्ग निघेल, आपण वेळ द्यावी, चर्चेतून मार्ग निघेल. यावर बच्चू कडू यांनी दोन्ही मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांशी बोला आणि फोन लावा आणि कर्जमुक्तीबाबत हो आहे की नाही याबाबत विचारा असे सांगितले. तसेच आम्ही शांत बसलो की सरकार शांत होते. आम्ही जेलभरो करायला लागलो की तुम्ही लगेच आलात. आम्ही 4 वाजता तुम्ही येणार यासाठी वाट पाहिली. सहा वाजता कोर्टाचा आदेश आला तुम्ही यायला हवे होते, आम्ही जेलभरो करायला गेलो तुम्ही आलात, असे बच्चू कडू म्हणाले. यावेळी राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शेतकरी नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर सरकारनं केलेल्या विनंतीप्रमाणं बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करतील. या काळात आंदोलन शांततेत सुरु राहिल्यास कुठलाही त्रास प्रशासनाकडून होणार नाही, असे पंकज भोयर म्हणाले. तर, बच्चू कडू यांनी आंदोलन न थांबवता मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचे जाहीर केले. जर तोडगा निघाला नाही किंवा आम्हाला चुना लावण्याचा प्रयत्न केला, तर आल्यानंतर थेट रेल रोको करणार असा इशारा बच्चू कडूंनी दिला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >