मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ मध्ये मोठा उलटफेर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडला पराभूत करून पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने गतविजेत्या इंग्लंडचा १२५ धावांनी पराभव केला.
या विजयासह, दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने नॉकआऊटमधील अपयशाचा शिक्का पुसून टाकला आहे, तर इंग्लंडचा संघ सलग दुसऱ्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न पूर्ण करू शकला नाही.
दक्षिण आफ्रिकेने ३१९ धावांचा डोंगर उभा केला
गुवाहाटीमध्ये झालेल्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने कर्णधार लॉरा वूलव्हार्ड्ट च्या विक्रमी शतकाच्या जोरावर ५० षटकांत ७ गडी गमावून ३१९ धावांचा डोंगर उभा केला. लॉरा वूलव्हार्ड्टने १४३ चेंडूंमध्ये २० चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १६९ धावांची अविस्मरणीय खेळी केली.
लॉरा व्यतिरिक्त, मारीझान कॅपने ४२ धावा, तझमिन ब्रिट्सने ४५ धावा आणि क्लो ट्रायॉनने २१ धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून सोफी एक्लेस्टोनने सर्वाधिक ४ बळी घेतले, तर लॉरेन बेलने २ बळी घेतले.
इंग्लंडची फलंदाजी सपशेल अपयशी
प्रत्युत्तरादाखल, इंग्लंडच्या संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. एकामागून एक महत्त्वाचे गडी गमावल्यामुळे इंग्लंडचा संघ कधीही सावरू शकला नाही. मारीझान कॅपच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडचे अव्वल फलंदाज लवकर बाद झाले. नॅट सायव्हर-ब्रंटने झुंजार ६४ धावा आणि ॲलिस कॅप्सीने ५० धावा करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण इतर खेळाडूंकडून त्यांना साथ मिळाली नाही. इंग्लंडचा संपूर्ण संघ ४२.३ षटकांत १९४ धावांवर ऑल आऊट झाला.
मारीझान कॅप ठरली हिरो
दक्षिण आफ्रिकेच्या विजयाची खरी नायिका ठरली मारीझान कॅप. फलंदाजीत ४२ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिल्यानंतर, तिने गोलंदाजीतही कमाल केली. कॅपने अवघ्या २० धावा देऊन ५ बळी मिळवले. या शानदार अष्टपैलू कामगिरीमुळे ती सामनावीर (Player of the Match) पुरस्काराची मानकरी ठरली.
इतिहास रचला
दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. फायनलमध्ये त्यांचा सामना दुसऱ्या उपांत्य फेरीतील (भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया) विजेत्या संघाशी होईल.






