Wednesday, October 29, 2025
Happy Diwali

'द ताज स्टोरी' वादात! हायकोर्टाचा तातडीच्या सुनावणीस नकार; काय आहे नेमकं प्रकरण?

'द ताज स्टोरी' वादात! हायकोर्टाचा तातडीच्या सुनावणीस नकार; काय आहे नेमकं प्रकरण?

नवी दिल्ली : अभिनेते परेश रावल यांची प्रमुख भूमिका असलेला आगामी चित्रपट 'द ताज स्टोरी' प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटाच्या आशयामुळे आणि त्याला सेन्सॉर बोर्डाने दिलेल्या प्रमाणपत्राविरोधात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर (PIL) तातडीने सुनावणी घेण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. ३१ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, मात्र ट्रेलर रिलीज होताच या वादाला तोंड फुटले आहे.

नेमकी याचिका कशासाठी?

'द ताज स्टोरी' चित्रपटाच्या प्रदर्शनावर त्वरित बंदी घालावी आणि सेन्सॉर बोर्डाने (CBFC) दिलेले प्रमाणपत्र रद्द करावे, अशी मागणी करणारी ही जनहित याचिका होती. यासंदर्भात त्वरित सुनावणी व्हावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला केली. मात्र, न्यायालयाने या केसमध्ये तातडीने सुनावणी करण्याची कोणतीही आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे, ही याचिका त्वरित सुनावणीसाठी यादीत (लिस्टमधील) समाविष्ट केली जाणार नाही, असा निर्णय न्यायालयाने दिला.

इतिहासाची चुकीची मांडणी केल्याचा आरोप

वकील शकील अब्दुल्ला यांनी दिल्ली उच्च न्यायालयात ही जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितले की, चित्रपटात इतिहासाची चुकीच्या पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे. ज्यामुळे समाजात आणि दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार आणि सेन्सॉर बोर्डाला चित्रपटाच्या संभाव्य वाईट परिणामांची कल्पना असूनही त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही, असा आरोपही याचिकाकर्त्याने केला आहे.

याचिकाकर्त्यांची मागणी काय?

याचिकाकर्त्याने सेन्सॉर बोर्डाला चित्रपटाच्या प्रमाणपत्राची पुन्हा एकदा समीक्षा करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे. गरज पडल्यास चित्रपटाला 'अडल्ट सर्टिफिकेट' द्यावे किंवा काही आक्षेपार्ह दृश्ये वगळण्याचा आदेश द्यावा. तसेच, चित्रपटात ही कथा काल्पनिक असून ऐतिहासिक तथ्यांवर आधारित असल्याचा दावा करत नाही, असा 'डिस्क्लेमर' (अस्वीकरण) जोडण्याची सूचनाही याचिकेत केली आहे.

चित्रपटाची स्टारकास्ट आणि प्रदर्शनाची तारीख

या चित्रपटाचा ट्रेलर १६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला होता आणि त्यानंतर लगेचच यावर वाद सुरू झाला. 'द ताज स्टोरी' या चित्रपटात परेश रावल यांच्यासोबत झकीर हुसेन, अमृता खानविलकर, स्नेहा वाघ आणि नमित दास यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. सी.ए. सुरेश झा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर तुषार अमरीश गोयल यांनी लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.

हा चित्रपट ३१ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता चित्रपट निर्धारित वेळेत प्रदर्शित होतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >