Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

'मालवणी'ला प्रतिष्ठा देणारा नाटककार

'मालवणी'ला प्रतिष्ठा देणारा नाटककार

मालवणी नाटकांचा पाया रचणारे आणि या भाषेला जागतिक मंच देणारे ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचे निधन झाले. नाटकाने मराठी रंगभूमीवर मालवणी भाषेची प्रतिष्ठा वाढवली आणि मच्छिंद्र कांबळी यांच्यासारखा मालवणी नटसम्राट घडवला. वस्त्रहरणचे तब्बल पाच हजारांहून अधिक प्रयोग झाले आणि या नाटकाचे प्रदर्शन दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या ‘भारत रंगमहोत्सव’मध्येही झाले. त्या काळातील अनेक गाजलेल्या किश्श्यांना साठवून ठेवणारे त्यांचे आत्मकथन ‘व्हाया वस्त्रहरण’ हे पुस्तक रसिकांच्या मनात आजही लोकप्रिय आहे. त्याचबरोबर 'ऐसपैस' हे त्यांचे आणखी एक उल्लेखनीय लेखन म्हणून ओळखले जाते. नानांच्या जाण्याने खऱ्या अर्थाने मालवणी माणूस ‘पोरको झालो आसा. नानांचो हसत खेळत असणारो मालवणी संवाद मराठी माणसांक कायमच आठवत ऱ्हवात. आमच्या नानांका देवान् चिरनिद्रा देवची हीच भावपूर्ण आदरांजली.’

काही व्यक्ती आपल्या घरातील नसतात किंवा नात्यातीलही नसतात; परंतु तरीही त्या मनोमन आपल्याच वाटतात. काहींच्या थेट ओळखीची असते, तर काहींना अशी व्यक्ती ओळखतही नाही; परंतु तरीही अशी व्यक्ती आपली वाटते. का कुणास ठाऊक, परंतु 'वस्त्रहरण' नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर यांच्या बाबतीतही कोकणात, मालवणी मुलखात अशीच भावना आहे. गंगाराम गवाणकर यांच्या निधनाची बातमी धडकली आणि मालवणी मुलखात आपल्याच घरचा माणूस गेल्याचे धस्स झाले आणि तेही साहजिकच आहे. ‘वस्त्रहरण’सारख्या पूर्णपणे मालवणी भाषेचा बाज असलेल्या नाटकाने मालवणी मुलुख, इथली भाषा सातासमुद्रापार लंडन, अमेरिकेपर्यंत पोहोचवली. त्यामध्ये ‘वस्त्रहरण’मधील तात्या सरपंच अर्थात अभिनेते स्व. मच्छिंद्र कांबळी यांचा मोठा वाटा आहे; परंतु ‘वस्त्रहरण’चे लेखक गंगाराम गवाणकर यांच्या संहितेने वस्त्रहरण नाटकातील संवादाने त्याला चारचाँद लागले. माडबन, ता. राजापूर या खाडीकिनाऱ्याच्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या गावात गवाणकर यांचा जन्म झाला. माडबन गाव खऱ्या अर्थाने गंगाराम गवाणकर यांच्यामुळे अधिक चर्चेत आले. घरची गरिबी होती. त्यामुळे शालेय जीवनापासून सोसाव्या लागलेल्या हालअपेष्टांनी खरंतर कोणीही माणूस उमेद हरून जाईल, परंतु गवाणकर यांचं सारं आयुष्य कष्ट करण्यात गेले.

पूर्वी आणि आजही गावात राहून काय खायचं हा प्रश्न असल्याने कोकणातील असंख्य तरुण त्या काळात आणि आजही शहराकडे धाव घेतात. त्याकाळी तर गावात राहून उदरनिर्वाहाचं काही साधन नव्हतं. कोकणातील जवळपास सर्वच घरातील परिस्थिती ही सारखीच होती. यामुळे मुंबई गाठण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याप्रमाणेच माडबनच्या गंगाराम गवाणकरांनी मुंबई गाठली. जे जमेल, पडेल ते काम त्यांनी केले. मालवणी मुलखातला माणूस हा मुळातच नाटक वेडा आहे. गंगाराम गवाणकरांनी बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम केले. आयुष्यातील खडतर प्रवासाला सामोरे जाताना गवाणकर यांनी कधीही स्वत:ला सहन कराव्या लागलेल्या संकटांचा दिखावा केला नाही. सतत हसतमुख आणि प्रसन्नतेने मालवणी भाषेच्या या लेखकाने नेहमीच सर्वांचे स्वागत केले. ‘वस्त्रहरण’ नाटक सुरुवातीला चाललेच नाही. एव्हाना कोकणातील ‘वस्त्रहरण’चा पहिला, दुसरा दौरा फ्लॉप गेला होता; परंतु लेखक गंगाराम गवाणकर, भद्रकालीचे सर्वेसर्वा अभिनेते मच्छिंद्र कांबळी आणि वस्त्रहरणमधील इब्लीस मास्तर दिग्दर्शक स्व. रमेश रणदिवे या सर्वांनीच वस्त्रहरण नाटक सुरुवातीला चालत नाही हे लक्षात येऊनही न डगमगता प्रयोग चालू ठेवले. ‘वस्त्रहरण’ नाटकाचा एक प्रयोग मुंबईत झाला. हा नाट्यप्रयोग पाहायला सुप्रसिद्ध साहित्यिक, नाटककार, अभिनेते, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे त्या प्रयोगाला आले होते. भाईंनी त्या नाट्यप्रयोगानंतर जे वक्तव्य केलं, त्या चार-दहा वाक्यांनी 'वस्त्रहरण' हाऊसफुल्ल होऊ लागले. 'वस्त्रहरण'मधील या आठवणी सांगताना गंगाराम गवाणकर नेहमी म्हणायचे ‘भाईंनी वस्त्रहरण पाहिल्यानंतर आमचा वस्त्रहरण कधी थांबलाच नाय’. ‘वस्त्रहरण’ नाटक लंडन दौऱ्यासाठी गेलं. त्या दौऱ्यातील आठवणी आणि वस्त्रहरण नाटक लंडनला जाण्यापूर्वी कोकणातील इरसाल मालवणी माणसांच्या प्रतिक्रियाही फार गंमतीशीर होत्या.

‘या 'वस्त्रहरण'वाल्यांक एष्टीत्सून फिराक पैशे नाय आणि लंडनाक चालले हत. लंडनाक जावचा म्हणजे काय खावचा काम आसा काय? ह्येंका वाटता काय?’असा संवाद त्या काळी गंगाराम गवाणकर यांच्याही कानी पडला; परंतु गवाणकर यांनीही मालवण माणसाचा हा खवचटपणा तितक्याच सहजतेने घेतला. गवाणकर हे जसे लेखक होते. तसेच ते अभिनेतेही होते. लीलाधर कांबळी यांच्या मृत्यूपश्चात वस्त्रहरण नाटकात मास्तरची भूमिका दस्तुरखुद्द गंगाराम गवाणकर करायचे. गंगाराम गवाणकर यांचा मास्तरही प्रेक्षकांना तितकाच भावला होता. ‘वस्त्रहरण’ नाटक येण्यापूर्वी काही मालवणी लेखकांनी एकांकिका जरूर लिहिल्या. रमण माळवदे यांची ‘वाघ इलो वाघ’सारखी एकांकिका त्याकाळी शाळा-महाविद्यालयात सादर व्हायची; परंतु 'वस्त्रहरण' नाटकाच्या आगमनाने मालवणी भाषेचा एक वेगळा प्रभाव जगभरातील मराठी मनावर कोरला गेला. तीस-चाळीस वर्षांपूर्वी मुंबईतील लोकलच्या प्रवासात मालवणी कोणी बोलत असेल, तर तो घाबरत बोलायचा. मराठी बोलणाऱ्यांना मालवणी भाषेतील संवाद फार रूचायचा नाही; परंतु जेव्हा 'वस्त्रहरण' फॉर्मात आले तेव्हापासून मराठी भाषेतील वेगळा बाज आणि सौंदर्य असलेल्या मालवणी भाषेला निश्चितच मानाचं पान मिळू लागलं. वस्त्रहरणचे लेखक गवाणकर आणि अभिनेते मच्छिंद्र कांबळी यांनी मालवणी बोलताना लाजण्याचे, कमी वाटण्याचे कारणच नाही, उलट मालवणी बोली अभिमानाने बोलावी असं वातावरण खऱ्या अर्थाने ‘वस्त्रहरण’ने निर्माण केलं. राजधानी मुंबई असेल किंवा उपराजधानी नागपूर मालवणी बोलणारी व्यक्ती दिसली की वेगळाच आपलेपणा वाटतो. गवाणकर यांनी जसं ‘वस्त्रहरण’ नाटक लिहिलं. तसंच ‘वात्रट मेले’ हे नाटकही त्यांनी लिहिलं. ‘वात्रट मेले’ या नाटकाचेही दोन हजारांवर प्रयोग झाले.

गवाणकर यांच्यामधला सरळ, साधा आणि तितकाच दिलखुलास लेखक, मालवणी मनाचा माणूस आज आपल्यात नाही. कोकणातील विशेषकरून मालवणी मुलखातीत कोणत्याही कार्यक्रमाला, ‘नाना तुम्ही या कार्यक्रमाक कायव करून येवक व्हया’, असा आग्रह कोणत्या मालवणी माणसाने केला तर नानांनी कधीही ‘नाही’ म्हटलं नाही.

तो कार्यक्रम लहान आहे की मोठा याचा विचार न करता गवाणकर कार्यक्रमाला पोहोचायचे. मालवणीत वस्त्रहरण नाटकाच्या निमित्ताने असलेल्या आठवणींची शिदोरी उपस्थितांसमोर मांडायचे आणि त्यांच्या मालवणी बोलीने उपस्थित असणारे सारेच खळाळून हसत दाद द्यायचे. विजयदुर्ग किल्ल्यावर उभं राहिल्यावर माडबन गाव दिसतं. माडा, पोफळीच्या बागायतीत माडबन गाव खुणावत असतं. विजयदुर्ग खाडीच्या पलीकडे माडबन गाव आहे. माडबन गावची खऱ्या अर्थाने ओळख गंगाराम गवाणकर उर्फ नानांमुळे झाली आहे. गवाणकरांच्या जाण्याने मालवणी मुलखाचे, मालवणी भाषेचे मोठे नुकसान झाले.

निर्माते प्रसाद कांबळी यांच्या भद्रकाली प्रॉडक्शनच्या माध्यमातून ‘वस्त्रहरण’ नाटक कालही रंगमंचावर धुमाकूळ घालत होते आणि आजही पूर्वीच्याच जोशात हे नाटक नाट्यगृहाबाहेर ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड मिरवत असते. भविष्यकाळातही ‘वस्त्रहरण’ त्याच दिमाखात मराठी मनावर अधिराज्य करेल, यात शंका नाही. ‘वस्त्रहरण’ या शब्दाशीच नाटकाच्या निमित्ताने गंगाराम गवाणकर हे नाव जोडले गेले आहे. नानांच्या जाण्याने खऱ्या अर्थाने मालवणी माणूस ‘पोरको झालो आसा. नानांचो हसत खेळत असणारो मालवणी संवाद मराठी माणसांक कायमच आठवत ऱ्हवात. आमच्या नानांका देवान् चिरनिद्रा देवची हीच भावपूर्ण आदरांजली.’

- संतोष वायंगणकर

Comments
Add Comment