मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई शहराला स्वच्छ ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या महानगरपालिकेच्या सफाई कामगारांसाठी हाती घेण्यात आलेल्या 'आश्रय' योजनेअंतर्गत काही वसाहतींमधील पुनर्विकासाचे काम पूर्णत्वास येत आहे. या प्रकल्प कामातून डिसेंबर २०२५ पर्यंत ५१२ सदनिका उपलब्ध होणार आहे. या उपलब्ध सदनिकांचे वाटप त्या वसाहतींमध्ये राहणाऱ्या कामगारांना लॉटरी द्वारे करण्यात येणार आहे. तर ३० जून २०२८ पर्यंत १२००० सदनिका बांधून उपलब्ध होतील असा महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचा अंदाज आहे.
मुंबई महापालिका सफाई कामगारांच्या एकूण ३० वसाहतींचा पुनर्विकास 'आश्रय' योजनेअंतर्गत घनकचरा व्यवस्थापन विभागाने हाती घेतला आहे. या खात्यातील सफाई कामगारांच्या एकूण ४६ वसाहतींपैकी ३० वसाहतींचा पुनर्विकास करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यातील २३ ठिकाणी प्रथम कामे सुरु झाली होती आणि आता उर्वरीत ठिकाणीही कामे सुरु होत आहेत. या महत्त्वाकांक्षी आश्रय योजनेद्वारे सफाई कामगारांना वाढीव क्षेत्रफळाची अर्थात ३०० चौ. फूटांची सुमारे १२,००० सेवा निवासस्थाने बांधली जाणार आहेत.
या आश्रय योजनेतंर्गत सरदार नगर रावळी कॅम्प, कल्पक प्लॉट, रावळी ट्रान्झिट कँप, एन एम जोशी रोड, ए बी नाय रोड, यारी रोड, प्रगती नगर, मिठा नगर, जेपी नगर, आकुर्ली रोड, बाभई नाका, वामनवाडी सिंधी सोसायटी, चिराग नगर येथील वसाहतींचा पुनर्विकासातील तब्बल ५१२ सदनिका डिसेंबर २०२५ पर्यंत उपलब्ध होणार आहेत. या सदनिकांचे वाटप याठिकाणी राहणाऱ्या कामगारांना लॉटरी द्वारे करण्यात येणार आहे. तसेच ३० जुन २०२६ पर्यंत ३५०० सदनिका उपलब्ध होणार आहे. महापालिका उपायुक्त किरण दिघावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आश्रय योजनेतंर्गत डिसेंबर २०२५ पर्यंत ५१२ सदनिका उपलब्ध होणार असून त्यांचे वाटप येथील कामगारांच्या कुटुंबांना लॉटरीद्वारे केले जाईल. दादर गौतम नगर आणि फलटन रोड येथील सफाई कामगारांच्या वसाहतीतील इमारती तथा चाळ पूर्णपणे रिक्त होत असून तेथील पुनर्विकासाला अधिक गती मिळेल असा विश्वास दिघावकर यांनी व्यक्त केला.
आश्रय योजनेतंर्गत अशाप्रकारे बांधून मिळणार सदनिका ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत : ५१२ सदनिका ३० जून २०२६ पर्यंत : ३५०० सदनिका ३० जून २०२७ पर्यंत :८००० सदनिका ३० जून २०२८ पर्यंत : १२००० सदनिका





