फलटण: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा झाला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी डॉक्टरने स्वतः लटकवलेल्या ओढणीचा सेल्फी फोटो संशयित आरोपी प्रशांत बनकर याला पाठविल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मृत डॉक्टरने आत्महत्येपूर्वी प्रशांत बनकरसोबत व्हॉट्सअॅपवर संवाद साधला होता. त्याच दरम्यान तिने तो सेल्फी पाठवला होता. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल ताब्यात घेऊन त्याची सखोल डिजिटल तपासणी केली असता हा फोटो उघडकीस आला. गुप्त सूत्रांकडून ही माहिती समोर आली आहे.
दरम्यान,व्हॉट्सअॅप चॅट्स डिलीट झाल्याचा आरोप डॉक्टर तरुणीच्या नातेवाईकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी सांगितले की, मिळालेल्या सर्व डिजिटल पुराव्यांची तपासणी सायबर तज्ज्ञांच्या मदतीने सुरू आहे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
फलटण येथील या आत्महत्या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. विविध ठिकाणी नागरिक आणि वैद्यकीय कर्मचारी महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी आंदोलनं आणि मोर्चे काढत आहेत.
मृत डॉक्टरने आत्महत्येपूर्वी आपल्या तळहातावर सुसाईड नोट लिहिली होती. त्या नोटमध्ये तिने पोलिस अधिकारी गोपाळ बदने आणि प्रशांत बनकरवर लैंगिक तसेच मानसिक छळाचे गंभीर आरोप केलेत. पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला असून, दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.






