फलटण : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील तरुण महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणात हत्या की आत्महत्या? या प्रश्नाला आता नवे वळण आले आहे. या प्रकरणात डॉक्टरची हत्या करण्यात आली, असा आरोप विरोधकांकडून होत असतानाच हॉटेल मधुदीपचे मालक दिलीप भोसले यांनी सीसीटीव्ही फुटेज सादर करून आपली बाजू मांडली आहे.
भोसले यांनी माध्यमांना माहिती दिली की, संबंधित डॉक्टर मध्यरात्री दीडच्या सुमारास हॉटेलमध्ये एकटीच आली होती. “ती स्वतः हॉटेलमध्ये आली होती, कोणालाही सोबत घेऊन आलेली नव्हती. तिच्या गाडीचे पार्किंगदेखील आमच्या सिक्युरिटी कर्मचाऱ्यांनी केले होते, त्यानंतर तिने रात्रीच चेक-इन प्रक्रिया पूर्ण केली व आम्ही तिला खोलीची चावी सोपवली,"अशी माहिती त्यांनी दिली.
हॉटेल मालकाच्या मते, ती महिला डॉक्टर खूप चिंतेत आणि विचारात दिसत होती. चेक-इनच्या वेळी तिने सांगितले होते की तिला दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता बारामतीला जायचे आहे, आता जाणे शक्य नसल्यामुळे रूम हवा आहे.
भोसले यांनी सांगितले, “सकाळी साडेनऊच्या सुमारास तिने इंटरकॉमवर फोन केला होता. त्या वेळी ती व्यवस्थित होती. मात्र, दुपारी १२.३० वाजता कर्मचाऱ्यांची शिफ्ट बदलल्यानंतरही ती बाहेर आली नाही. आम्ही दरवाजा ठोठावला, पण प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे पोलिसांना तातडीने माहिती दिली. त्यानंतर आम्ही दरवाजा उघडला. आत गेल्यावर ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.”
या घटनेवर ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देत म्हटले होते की, “डॉक्टरला हॉटेलमध्ये बोलावून तिची हत्या करण्यात आली,” असा आरोप केला होता.
मात्र, हॉटेल मालक दिलीप भोसले यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत म्हटले की, “आमच्या हॉटेलला विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमच्याकडे असलेले सीसीटीव्ही फुटेजच खरी परिस्थिती सांगते.”
दरम्यान, पोलिसांनीही हॉटेलचा सीसीटीव्ही फुटेज आणि डॉक्टरचा कॉल रेकॉर्ड तपासण्यास सुरुवात केली असून, घटनास्थळावरील तपास सुरू आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून अधिक तपासात माहिती समोर येण्याची शक्यता आहे.






