नवी दिल्ली : ऑफिसमध्ये सुट्टीसाठी ईमेल लिहिणं ही रोजचीच बाब असते. पण अलीकडेच एका Gen Z कर्मचाऱ्याने आपल्या मॅनेजरला पाठवलेला सुट्टीचा ईमेल सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. कारण या कर्मचाऱ्याने सुट्टीसाठी दिलेलं कारण ऐकून सर्वजण अचंबित झाले आहेत. त्याचं नुकतंच ब्रेकअप झालं होतं आणि त्याने थेट त्याच कारणासाठी १० दिवसांची रजा मागितली.
काय होतं त्या ईमेलमध्ये?
Knot Dating या कंपनीचा सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जसवीर सिंग यांनी हा ईमेल सोशल मीडियावर शेअर केला. त्यांनी म्हटलं, “मला माझ्या करिअरमधला सर्वात प्रामाणिक ईमेल मिळाला.”
“हॅलो सर, अलीकडेच माझं ब्रेकअप झालं आहे आणि त्यामुळे मला माझ्या कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही. मला थोड्या विश्रांतीची गरज आहे. मी आज घरून काम करतो आणि २८ ते ८ तारखेपर्यंत सुट्टी हवी आहे.”
जसवीर सिंग यांनी या ईमेलचा स्क्रीनशॉट शेअर करत म्हटलं, “Gen Z पिढी कोणतेही फिल्टर वापरत नाही. ते जे अनुभवतात, ते स्पष्टपणे सांगतात.” त्यांनी या रजेचा अर्ज लगेच मंजूर करत दोनच शब्दांत उत्तर दिलं “Leave approved, instantly.”
Got the most honest leave application yesterday. Gen Z doesn’t do filters! pic.twitter.com/H0J27L5EsE
— Jasveer Singh (@jasveer10) October 28, 2025
जसवीर सिंग यांची ही पोस्ट काही तासांतच व्हायरल झाली आणि तिला ३.७ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले. हजारो युजर्सनी या कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं. एका युजरने लिहिलं, “हे कारण इतकं खरं आहे की त्यापेक्षा काही चांगलं सांगणं शक्य नव्हतं.” तर दुसऱ्याने गंमतीने म्हटलं, “भाई, लग्नासाठीही लोक इतकी मोठी सुट्टी घेत नाहीत.” तर काहींनी सीईओच्या संवेदनशीलतेचंही कौतुक करत लिहिलं, “बॉस समजूतदार असेल तर कर्मचारीही मनापासून काम करतो.”
साधारण १९९७ ते २०१२ दरम्यान जन्मलेल्यांना Gen Z म्हटलं जातं. ही पिढी मोबाइल, इंटरनेट आणि सोशल मीडियासोबत वाढलेली आहे. ती आपल्या भावना लपवत नाही, कोणताही दिखावा न करता थेट बोलते. मानसिक आरोग्य आणि वर्क-लाईफ बॅलन्सला ही पिढी विशेष महत्त्व देते.
जसवीर सिंग यांच्या मते, “ही पिढी कामाच्या ठिकाणी भावनांबद्दल बोलायला घाबरत नाही. ते स्वतःच्या मानसिक स्थितीबद्दलही स्पष्ट असतात आणि हेच त्यांच्या प्रामाणिकतेचं लक्षण आहे.”
काहींनी या ईमेलला "Gen Z पिढीच्या पारदर्शकतेचं उत्तम उदाहरण" म्हटलं आहे, तर काहींनी विनोदाने घेतलं. मात्र एक गोष्ट निश्चित, नवीन पिढी भावना दडवून ठेवत नाही, त्या व्यक्त करते, आणि हेच त्यांचं वेगळेपण ठरलं आहे.






