कॅनबेरा : कॅनबेरातील मनुका ओव्हल स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत–ऑस्ट्रेलिया पहिल्या टी२० सामन्यात पुन्हा एकदा पावसाने खेळात व्यत्यय आणला आहे. आकाशात अचानक दाटलेले ढग आणि सततचा हलका पाऊस यामुळे खेळाडूंना पुन्हा मैदान सोडावे लागले. पावसामुळे झालेल्या दीर्घ विलंबानंतर सामन्याचा कालावधी २० ऐवजी १८ षटकांपर्यंत मर्यादित करण्यात आला आहे.
सामन्याच्या सुरुवातीला भारतीय संघाने दमदार सुरुवात केली होती. अभिषेक शर्मा आक्रमक खेळ करताना १४ चेंडूंमध्ये १९ धावा करून नॅथन एलिसच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याच्या बाद झाल्यानंतर शुभमन गिल आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी जबाबदारी घेत भारताचा डाव स्थिर ठेवला. दोघांनी सर्व बाजूंनी आकर्षक फटकेबाजी करत धावगती कायम ठेवली आणि भारतीय फलंदाजीवर नियंत्रण मिळवले.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श यानी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. ओलसर हवामानामुळे गोलंदाजांना स्विंग मिळू शकेल, या आशेवर त्यांनी हा निर्णय घेतल्याचे दिसून आले.
भारतासाठी चिंतेची बाब म्हणजे अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी दुखापतीमुळे या मालिकेतील तीनही सामने गमावणार आहे. त्याच्या अनुपस्थितीमुळे टीम इंडियाला अष्टपैलू पर्यायांच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे.
सध्या पावसामुळे सामना तात्पुरता थांबलेला असला तरी, मैदान कोरडे झाल्यानंतर खेळ पुन्हा सुरू होईल अशी अपेक्षा आहे. चाहत्यांच्या नजरा आता सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिलच्या जोडीवर खिळल्या आहेत कारण त्यांच्या फलंदाजीवरच भारताचा डाव उंच झेपावेल.






