Wednesday, October 29, 2025
Happy Diwali

कबुतरखान्यांसाठी महापालिकेकडून पर्यायी जागांचा शोध

कबुतरखान्यांसाठी महापालिकेकडून पर्यायी जागांचा शोध

मुंबई : मुंबईतील कबुतरखान्यांसाठी जनतेला तथा नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा शोध घेऊन मुंबई महानगरपालिकेने त्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जैन समाजाच्या शिष्टमंडळाने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्याकडे केली. दरम्यान, अशा पर्यायी जागांचा शोध घेऊन त्याबाबतची माहिती न्यायालयाकडे सादर करण्यात येईल, असे गगराणी यांनी या शिष्टमंडळाला सांगितले.

मुंबई महानगरात ठिकठिकाणी असणारे कबुतरखाने न्यायालयाच्या आदेशान्वये बंद करण्यात आले आहेत. तसेच, कबुतरखान्यांच्या ठिकाणी नियंत्रित पद्धतीने व ठरावीक वेळेतच कबुतरांना खाद्य पुरवावे किंवा कसे, तसेच यातील अन्य मुद्द्यांबाबत माननीय न्यायालयाच्या आदेशान्वये हरकती तथा सूचना मागविण्याची कार्यवाहीही महानगरपालिका प्रशासनाने केली.

या सर्व पार्श्वभूमीवर श्री मुंबई जैन संघ संगटनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त भूषण गगराणी यांची मंगळवारी २८ ऑक्टोबर रोजी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात भेट घेतली. मुंबईतील सर्व प्रशासकीय विभागांमध्ये अशा जागांचा शोध घ्यावा की जिथे कबुतरांना दाणे पुरवता येतील आणि नागरिकांनाही कबुतरखान्यांचा त्रास होणार नाही, अशी प्रमुख मागणी या शिष्टमंडळाने केली. मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने अशा पर्यायी जागांचा शोध घेण्यात येईल. तसेच, या कबुतरखान्यांची बाब न्यायप्रवीष्ट असल्याने अशा पर्यायी जागांची माहिती न्यायालयासमोर सादर करण्यात येईल, असे गगराणी यांनी यावेळी स्पष्ट केले.

Comments
Add Comment