Thursday, January 1, 2026

कॅनडामध्ये भारतीय वंशाच्या उद्योगपतीची हत्या! बिश्नोई टोळीतील सदस्याने दिली हत्येची कबूली

कॅनडामध्ये भारतीय वंशाच्या उद्योगपतीची हत्या! बिश्नोई टोळीतील सदस्याने दिली हत्येची कबूली

कॅनडा: कॅनडात भारतीय वंशाचे उद्योगपती दर्शन सिंग साहसी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. कॅनडातील ॲबॉटस्फोर्ड येथे गाडीमध्ये त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. हल्लेखोर साहसी यांच्या कारमध्ये दबा धरून बसला होता. साहसी गाडीत बसताच त्याने गोळीबार केला आणि पळून गेला. यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांना रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

कॅनडा पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीनंतर, या हत्येमागे कोणत्याही गँगस्टर किंवा खंडणी टोळीचा थेट सहभाग नसल्याचे म्हटले आहे. दर्शन सिंग यांच्या कुटुंबीयांनी देखील या संदर्भात कोणताही संशय व्यक्त केलेला नाही. त्यामुळे तपास यंत्रणांचा प्राथमिक अंदाज आहे की, ही हत्या एखाद्या जुन्या वादातून किंवा वैयक्तिक रागातून घडलेली असावी.

दरम्यान, लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित गुंड गोल्डी ढिल्लन याने सोशल मीडियावर पोस्ट करत या हत्येची कबुली दिली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, दर्शन सिंग यांच्याकडे व्यवसायाच्या बदल्यात काही रकमेची मागणी करण्यात आली होती. मात्र दर्शन सिंग यांनी पैसे देण्यास नकार देत नंबर ब्लॉक केला. त्यामुळे ही हत्या करण्यात आली.

दर्शन सिंग मूळचे पंजाबमधील लुधियानाचे रहिवासी होते. अनेक वर्षांपूर्वी ते व्यवसाय उभारणीच्या स्वप्नासाठी कॅनडा येथे स्थायिक झाले. कॅनडामध्ये त्यांनी मेहनतीच्या बळावर 'कॅनॅम ग्रुप' ही टेक्सटाइल रीसायकलिंग कंपनी उभारलीय. 'कॅनॅम ग्रुप' ही कंपनी जगभरातील ४० हून अधिक देशांमध्ये त्यांच्या पारदर्शक आणि टिकाऊ व्यवसाय पद्धतीसाठी ओळखली जाते. त्यांच्या कारख्यान्यात शेकडो कर्मचारी कार्यरत असून कॅनडातील भारतीय समुदायातही त्यांना मोठा मान होता.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >