नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर झाले असून या चक्रीवादळाला थायलंडने सुचवलेले ‘मोंथा’ हे नाव देण्यात आले आहे. पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर असणारे हे चक्रीवादळ मोंथा वेगाने उत्तर-पश्चिमेकडे सरकत आहे. मंगळवारी पहाटे ५.३० वाजता या चक्रीवादळाचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. दरम्यान ‘मोंथा’ चक्रीवादळामुळे ओडिशा, आंध्र प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांमध्ये ‘रेड अलर्ट’ देण्यात आला.
तसेच ही हवामान प्रणाली पहाटे ५.३० वाजता मछलीपट्टणमच्या १९० किमी दक्षिण ते आग्नेयेला, काकीनाडाच्या २७० किमी दक्षिण ते आग्नेयेला आणि विझागच्या ३४० किमी दक्षिण-आग्नेयेला केंद्रित होती, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी सोमवारी मोंथा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ज्या भागात पाऊस आणि पुराची शक्यता आहे अशा भागांत अधिकाऱ्यांना खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, ओडिशाच्या आठ जिल्ह्यांमध्येही मोंथा चक्रीवादळामुळे जोरदार पाऊस कोसळत आहेत. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, ओडिशा सरकारने मालकानगिरी, कोरापूट, रायगड, गजपती, गंजम, नबरंगपूर, कालाहांडी आणि कंधमाल या आठ जिल्ह्यांमधील सखल भागातून तसेच भूस्खलनाची शक्यता असलेल्या डोंगराळ प्रदेशातून लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.






