शेतकरी कर्जमाफी आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयाची सुमोटो दाखल, बच्चू कडूंना आंदोलन स्थळ रिकामे करण्याचे आदेश!
नागपूर : नागपूर येथील परसोडी गावाजवळ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुमोटो दखल घेतली आहे.
आंदोलनाची परवानगी २८ ऑक्टोबरसाठी होती मात्र, २९ तारखेला देखील आंदोलन सुरू असल्यामुळे परिसरातील वाहनांना व प्रवाशांना मोठा त्रास होत आहे. या भागात अनेक रुग्णालये असून, रुग्णांना देखील हालचाल करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे खंडपीठाने निदर्शनास आणले.
नागपूर खंडपीठाने बच्चू कडू यांच्यासह आंदोलनात सहभागी असलेल्या व्यक्तींना आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आंदोलन स्थळ रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, पोलीस अधिकाऱ्यांनी हा आदेश अंमलात आणण्याची प्रक्रिया सुरू ठेवावी आणि उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत याचा अहवाल सादर करावा, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
कोर्टाच्या आदेशानुसार नागपूर पोलीस आयुक्त, परिसराचे पोलीस अधिकारी आणि महामार्ग पोलिस यांनी आदेशाची पूर्तता करण्यास सांगितले आहे. पोलीसांच्या स्पेशल ब्रॅंचचे डीसीपी सातव यांनीही बच्चू कडू यांना भेटून आदेशाबाबत माहिती दिली.






