Wednesday, October 29, 2025
Happy Diwali

Police Encounter : इतिहासातील सर्वात मोठ्या एन्काऊंटरचा थरार! एका रात्रीत ६४ गुंडांचा खात्मा, कारवाईने देश हादरला

Police Encounter : इतिहासातील सर्वात मोठ्या एन्काऊंटरचा थरार! एका रात्रीत ६४ गुंडांचा खात्मा, कारवाईने देश हादरला

साओ पावलो, ब्राझील : एक काळ असा होता जेव्हा मुंबईत अंडरवर्ल्डची मोठी दहशत होती. ही दहशत मोडून काढण्यासाठी प्रदीप शर्मा, दया नायक, विजय साळसकर यांसारख्या धाडसी अधिकाऱ्यांच्या 'एन्काऊन्टर स्पेशालिस्ट' फळीने अनेक गुंडांना यमसदनी धाडून मुंबईला भयमुक्त केले. अगदी याच पावलावर पाऊल टाकत उत्तर प्रदेश पोलिसांनीही गेल्या काही वर्षांत गुंडांचा खात्मा करण्यासाठी एन्काऊन्टर सुरू केले आहेत. त्यामुळे भारतातील नागरिकांसाठी एन्काऊन्टर ही नवी बाब राहिलेली नाही. मात्र, पोलिसांनी एकाचवेळी ६४ गुंडांचा एन्काऊन्टरमध्ये खात्मा करण्याची घटना जगाच्या इतिहासातील पहिलीच आणि सर्वात मोठी असावी. हा थरार भारतात नाही, तर ब्राझीलमध्ये घडला आहे. ब्राझीलमधील पोलिसांनी एकाच मोहिमेत ६४ गुंडांचा खात्मा करत मोठी धडक कारवाई केली आहे. ही घटना जगातील सर्वात मोठ्या एन्काऊन्टर मोहिमेशी जोडली जात आहे. गुन्हेगारांविरुद्धच्या या मोठ्या कारवाईत काही पोलीस कर्मचाऱ्यांनीही आपला जीव गमावला आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ब्राझीलच्या पोलिसांनी केलेली ही कठोर कारवाई गुन्हेगारी जगतावर मोठी दहशत निर्माण करणारी ठरली आहे.

ब्राझीलच्या रिओ दी जेनेरोमध्ये रक्तरंजित चकमक: ४ पोलिसांना वीरमरण

या कारवाईत पोलिसांनी तब्बल ६४ गुंडांना यमसदनी धाडल्याचे वृत्त आहे, ज्यामुळे ही जगातील सर्वात मोठ्या एन्काऊन्टर मोहिमांपैकी एक ठरली आहे. मात्र, या कारवाईत ब्राझील पोलिसांनाही मोठी किंमत मोजावी लागली आहे. गुंडांशी झालेल्या भीषण चकमकीत ४ धाडसी पोलीस कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एलेमाओ आणि पनहा कॉम्प्लेक्स (Complex) फेवेला भागात ही चकमक (Encounter) उडाली होती. या दोन्ही भागांवर 'कमांडो वर्मेल्हो' (Comando Vermelho) नावाच्या कुख्यात टोळीचे वर्चस्व होते. पोलिसांनी विशेष नियोजन करून या टोळीविरुद्ध मोठी मोहीम हाती घेतली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त केले आहेत. संघटित गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी उचललेले हे कठोर पाऊल मानले जात आहे.

गुंडांकडून पोलिसांवर ड्रोनद्वारे हल्ला

रिओ दी जेनेरो येथे ६४ गुंडांना यमसदनी धाडणाऱ्या ऐतिहासिक एन्काऊन्टरनंतर या कारवाईचे अनेक धक्कादायक तपशील समोर येत आहेत. संघटित गुन्हेगारांनी पोलिसांच्या कारवाईत अडथळा आणण्यासाठी आणि त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा म्हणजेच ड्रोनचा वापर केल्याची माहिती मिळाली आहे. या टोळीतील गुंडांनी सैनिक आणि पोलिसांना अडवण्यासाठी अनेक गाड्या पेटवून दिल्या होत्या, इतकेच नव्हे तर त्यांनी पोलिसांवर हल्ले करण्यासाठी ड्रोनचाही वापर केल्याचे उघड झाले आहे. अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, या गुंडांविरोधात आणि त्यांच्या टोळीविरोधातील कारवाईची आखणी गेल्या वर्षभरापासून सुरू होती. या कारवाईत अंदाजे २,५०० च्या आसपास सैनिक आणि पोलिसांनी भाग घेतला होता. पोलिसांनी कारवाईदरम्यान गुंडांकडून कमीतकमी ४२ रायफल्स जप्त केल्या आहेत. 'कमांडो वर्मेल्हो' ही ब्राझीलमधील सर्वात जुनी आणि सक्रिय गुन्हेगारी टोळी आहे. या टोळीची सुरुवात १९८५ मध्ये ब्राझीलमधील लष्करी हुकूमशाहीच्या विरोधात उतरलेल्या तरुणांना तुरुंगात डांबण्यात आल्यावर झाली. या तुरुंगात या तरुणांनी 'रेड कमांड' नावाचा गट तयार केला, जो नंतर एका मोठ्या गुन्हेगारी टोळीत रुपांतरीत झाला. जगभर आपले जाळे पसरवणाऱ्या या टोळीचा मुख्य धंदा अंमली पदार्थांची तस्करी आणि खंडणी हा होता. पोलिसांनी केलेली ही विक्रमी कारवाई गुन्हेगारी जगतावर मोठी दहशत निर्माण करणारी ठरली आहे.

Comments
Add Comment