स्थानिक स्वराज्य संस्थांसोबत आता पुणे पदवीधर निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून, पुणे पदवीधर निवडणुकीसाठी आतापासूनच इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळत आहे. मागील निवडणुकीत महाविकास आघाडीकडून झालेला पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागल्याने ही उणीव भरून काढण्यासाठी यंदा पक्षाने चांगलीच कंबर कसली आहे.
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ (महाराष्ट्र विधान परिषदेचा पदवीधर मतदारसंघ) या आगामी निवडणुकीसंदर्भात विविध राजकीय पक्षांची ताकद, संभाव्य रणनिती, मुद्दे आणि परिस्थिती यावर लक्ष केंद्रित करणारी असणार आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर हे जिल्हे देखील या मतदारसंघांचा भाग आहे. म्हणून हे मतदारसंघ केवळ पुणे शहरापुरते मर्यादित नाहीत, तर आसपासच्या जिह्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. मागील निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतून अरुण लाड यांना उमेदवारी मिळाली. त्यांच्याविरोधात भाजपचे संग्रामसिंह देशमुख, मनसेच्या रूपाली पाटील, जनता दलाचे शरद पाटील, अपक्ष डॉ. श्रीमंत कोकाटे, बहुजन आघाडी सोमनाथ साळुंखे असे उमेदवार होते. मात्र, खरी लढत महाविकास आघाडी व भाजपमध्ये झाली.
एकूण झालेल्या मतांपैकी २ लाख २८ हजार २५९ मते वैध ठरली, तर तब्बल १९ हजार ४२८ मते अवैध ठरली. विजयासाठी १ लाख १४ हजार १३१ कोटा निश्चित करण्यात आला होता. महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांनी पहिल्याच फेरीत १ लाख २२ हजारांहून अधिक मते घेत एकहाती विजय मिळवला होता. त्यांचे विरोधक भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांना केवळ ७३ हजार एवढी मते मिळाली. लाड यांचा ४८ हजार ८२४ मतांनी विजय झाला. भाजपकडून शरद लाड हे इच्छुक आहेत. तर दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि जनसुराज्य पक्षातर्फे अनेकजण इच्छुक आहेत. या पक्षांकडून नव्याने मतदार नोंदणीचा धडाका सुरू झाला आहे. प्रत्येक पक्षाचे गटनेते पदवीधरांची मत नोंदणी अधिक कशी होईल, याकडे लक्ष देत आहेत. आमदार अरुण लाड यांचे सुपुत्र शरद लाड यांनी पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लक्षात घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता त्यांना भाजपमधून उमेदवारी मिळते का, याबद्दल औत्सुक्य आहे. आमदार लाड यांच्या जागी महाविकास आघाडीसाठी सध्या तरी शिक्षकेतर संघटनेचे शिवाजीराव खांडेकर हे दावेदार मानले जात आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे आमदार अरुण लाड यांचे सुपुत्र शरद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने समीकरणे बदलली असून, भाजपमधील इच्छुकांना चाप बसला आहे. मात्र, महाविकास आघाडीकडे उमेदवारीसाठी इच्छुकांना मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आमदार जयंत पाटील यांचे स्नेही व माजी खासदार एस. डी. पाटील यांचे नातू अॅड. धैर्यशील पाटील निवडणुकीसाठी रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. ते शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य होते. मंत्री हसन मुश्रीफ यांचे निवांत समर्थक प्रताप माने हे या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादीलाच जागा मिळावी, यासाठी येथील नेतेमंडळी अग्रेसर आहेत. जनसुराज्यचे सुमित कदम यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मनसेकडूनही काहीजण इच्छुक आहेत. उमेदवारी मिळाली नाही, तर काहीजण अपक्षही लढण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे ही निवडणूक आतापासूनच रंगत असल्याचे दिसून येत आहे. मतदार यादीमध्ये बदल होणार असून, नवीन मतदारांची भर, ऑनलाइन नोंदणी, नाव व मतदारशक्तीचा विस्तार हे आगामी निवडणुकीचे महत्त्वाचे मानले जात आहे. पदवीधर मतदारसंघ असल्याने ‘शिक्षण', ‘उद्योग-नोकरी', ‘उच्चशिक्षण सुविधा' यांचा चर्चेचा विषय होण्याची शक्यता जास्त आहे.
पक्षांनी उमेदवारीची घोषणा, प्रवासी अभियाने, मतदारांसमोर समोरासमोर भेटी यांच्या माध्यमातून तयारी करण्यात येणार आहे. मुख्य पक्षांमध्ये स्पर्धा वाढल्यास तिसऱ्या घटकांचा प्रभाव वाढू शकतो; उदा. विभाजित मत, मतदान कमी होणे, गुप्त वळण इत्यादी गोष्टी घडू शकतात. विद्यापीठ पदवीधर मतदारसंघात मतदार सक्रिय करण्यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. पूर्वी मतदार यादीतील चुकीचे ठिकाण, ओळखपत्रातील चुका या निवडणुकीमध्ये अडथळा ठरल्या होत्या. पक्षांनी उमेदवारी, आंतरिक मतभेद, गठबंधन यावर नियंत्रण ठेवले पाहिजे अन्यथा तो नकारात्मक परिणाम देऊ शकतो, अशी आव्हाने समोर असणार आहेत. स्थापित पक्ष म्हणून, अनुभव आणि गतकालीन विजय यांचा आधार घेत पुढे महाविकास आघाडी पुढे जाण्याची शक्यता आहे. भाजप पूर्वी हे पदवीधर मतदारसंघ त्यांचे म्हणत असत; परंतु पुनरागमन करण्यासाठी त्यांच्यामध्ये कटिबद्धता असावी लागेल. या भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्य निवडणूक होणार असली तरी अन्य पक्षातील उमेदवार मुख्य पक्षांमध्ये मत विभाजानसाठी शक्यता निर्माण करू शकतात. पुणे विभाग पदवीधर हे मतदारसंघ राजकीय दृष्टीने महत्त्वाचे स्थान आहे. स्थापित पक्षांची ताकद, विरोधकांची चढाओढ, मतदार यादीतील बदल आणि प्रचार यांचा संगम याच्या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त करून देतो. पुणे विभागातील पाच जिह्यांमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांची मतदार यादी नव्याने तयार करण्याच्या कार्यक्रमाअंतर्गत भारत सरकार आयोगाकडून विभागातील पात्र मतदारांनी संकेतस्थळावर ६ नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
- प्रतिनिधी






