Wednesday, November 19, 2025

हर्षित राणाची जागा जाणार? टीम इंडियात आणखी एका खेळाडूचे पुनरागमन !

हर्षित राणाची जागा जाणार? टीम इंडियात आणखी एका खेळाडूचे पुनरागमन !

मुंबई : टीम इंडियामध्ये आणखी एक वरिष्ठ खेळाडू संघात परतण्याच्या तयारीत असून, त्याच्या पुनरागमनामुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची डोकेदुखी वाढणार असल्याची चर्चा क्रिकेटविश्वात रंगली आहे. आणि या खेळाडूच्या परतीमुळे परिणामी गंभीरला आपल्या आवडत्या खेळाडूला संघाबाहेर ठेवावं लागू शकतं.

रोहित आणि विराटनंतर आता भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आहे. शमी सध्या बंगाल संघाकडून रणजी ट्रॉफी खेळत आहे आणि त्यानं आपल्या भेदक गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. शमीने अलीकडे दोन रणजी सामन्यांत शानदार कामगिरी करत एकूण १५ बळी घेतले आहेत. पहिल्या सामन्यात ७ आणि दुसऱ्या सामन्यात तब्बल ८ विकेट्स. त्याच्या या फॉर्ममुळे आता तो पुन्हा राष्ट्रीय संघात निवडला जाऊ शकतो, अशी चर्चा रंगली आहे.

गौतम गंभीर सध्या भारतीय संघात नव्या दमाचे खेळाडू तयार करण्यावर भर देत आहे. तो तरुण गोलंदाजांना संधी देत युवा संघ उभा करण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या पुनरागमनामुळे आधीच काही युवा खेळाडूंना संघाबाहेर बसावं लागलं. आता शमी संघात परतल्यास आणखी एका तरुण खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवायला लागणार आहे.

शमीच्या पुनरागमनामुळे गौतम गंभीरचा आवडता खेळाडू हर्षित राणा याची जागा धोक्यात येऊ शकते. सध्या जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांसारखे अनुभवी गोलंदाज संघात आहेत. अशा स्थितीत संघात तिसरा अनुभवी वेगवान गोलंदाज हवा असेल, तर शमीला प्राधान्य मिळू शकते आणि हर्षितला बाहेर बसावं लागण्याची शक्यता आहे.

कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या सामन्यात बंगालने गुजरातवर १४१ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात शमीने एकहाती ८ बळी घेतले आणि विजयात मोठा वाटा उचलला. याआधीच्या सामन्यात त्याने ७ विकेट्स घेतल्या होत्या. म्हणजेच केवळ दोन सामन्यांत त्याने तब्बल १५ विकेट्स मिळवून आपल्या फिटनेस आणि फॉर्मचं दमदार प्रदर्शन दाखवलं आहे.

सध्या भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे, त्यानंतर दक्षिण आफ्रिका भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेसाठी शमीला संघात स्थान मिळतं का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. जर त्याची निवड झाली, तर तो पुन्हा टेस्ट संघात परत येईल आणि संघ व्यवस्थापनासाठी निवड प्रक्रियेत मोठं आव्हान उभं राहील.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >