मुंबई : सध्या महाराष्ट्रातील राजकारण अॅनाकोंडा, अजगर या शब्दांच्या टीकेवरून चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर केलेल्या टीकेनंतर आता भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार शाब्दिक हल्ला केला आहे.
"अमित शाह यांना 'ॲनाकोंडा' म्हणणारे उद्धव ठाकरे हे स्वतःच 'अजगर' आहेत. या अजगराने आधी पक्ष गिळंकृत केला, मग शिवसैनिकांना गिळंकृत केले आणि शेवटी हिंदुत्वही गिळंकृत केले. उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त मानसिकतेतून टीका करत आहेत. सत्तेत असताना 'मी मुख्यमंत्री आणि माझा मुलगा मंत्री' यापलीकडे त्यांनी काहीही केले नाही. दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा त्यांनी आधी आपलं काचेचं घर सांभाळावं. उद्धव ठाकरेंच्या 'भुरटे चोर' या टीकेचा समाचार घेताना बावनकुळे म्हणाले, "खरा 'भुरटा चोर' कोण आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. जर उद्धव ठाकरे अशा छोट्या-छोट्या चोऱ्यांमध्ये अडकले नसते, तर आज ते राज्याचे मोठे नेते असते. पण 'भुरट्या चोरी'तच राहिल्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आली आहे," अशी जळजळीत टीका त्यांनी केली.
आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंवर 'आयत्या बिळावर नागोबा' म्हणत हल्लाबोल
भाजप नेते आणि राज्याचे मंत्री आशिष शेलार यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. 'आयत्या बिळावर नागोबा' या मराठी म्हणीचा वापर करत शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या राजकीय कार्यशैलीवर थेट निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेची सत्ता आणि महाविकास आघाडी सरकारची स्थापना अशा दोन्ही ठिकाणी याच पद्धतीने फायदा घेतल्याचा गंभीर आरोप शेलार यांनी केला.
मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची (अखंड) अनेक वर्षांपासून सत्ता आहे. शेलार यांनी अप्रत्यक्षपणे या सत्तेला 'आयते बिळ' संबोधून, ठाकरे गट कोणत्याही स्वतःच्या विशेष प्रयत्नांशिवाय केवळ पूर्वीच्या कामावर आणि वारशावर हक्क सांगत असल्याचा आरोप केला. २०१९ मध्ये भाजपसोबत युती तोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत एकत्र येत 'महाविकास आघाडी' सरकार स्थापन केले होते. हा निर्णय म्हणजे राजकीय संधी साधून सत्ता मिळवण्याचा प्रकार होता, असे शेलार यांचे म्हणणे आहे.
महायुती होणार, निवडणुका जिंकणार; बावनकुळे यांचा विश्वास
"आमची महायुती होणारच व महायुती म्हणूनच आम्ही ५१ टक्के मतांची लढाई जिंकू.." असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या स्वबळाच्या वक्तव्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, अमित शाह पक्ष मजबूत करण्याविषयी बोलले आहेत. त्यांच्या विधानाचा दुसरा अर्थ काढू नये."
भाजपचीच जुनी मागणी
मतदार याद्यांमध्ये अचूकता व पारदर्शकता राखण्यासाठी निवडणूक आयोगाने स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) प्रक्रिया सुरू केली आहे, याबाबत ते म्हणाले, मतदारयादी शुद्धीकरण ही भाजपचीच जुनी मागणी आहे. ही प्रक्रिया संपूर्ण देशाला लागू होणार असून निवडणूक आयोग टप्प्याटप्प्याने निर्णय घेईल. उलट, मतदार याद्या शुद्ध कराव्यात, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करावे, ही भाजपचीच २० वर्षे जुनी मागणी आहे. आम्ही स्वतः यासाठी निवडणूक आयोग आणि न्यायालयात गेलो होतो.






