Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरची प्रकृती सुधारतेय: भारतात कधी परतणार?

टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरची प्रकृती सुधारतेय: भारतात कधी परतणार?

ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर पुन्हा एकदा दुखापतीच्या संकटात सापडला आहे. नुकताच दुखापतीतून सावरून त्याने टीम इंडियात पुनरागमन केले होते, मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात झेल घेताना तो गंभीर जखमी झाला. ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर एलेक्स कॅरीचा झेल पकडताना पडल्याने अय्यरच्या बरगड्यांच्या खाली तीव्र दुखापत झाली आणि तपासणीत त्याच्या स्प्लीनमध्ये (प्लीहा) रक्तस्राव झाल्याचे समोर आले. परिस्थिती गंभीर झाल्याने त्याला तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.

वैद्यकीय तपासणीनंतर श्रेयस अय्यरवर किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आली असून ती यशस्वी झाली आहे. सध्या त्याची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे आणि तो आयसीयूतून बाहेर आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला अजून किमान पाच ते सात दिवस सिडनीच्या रुग्णालयात राहावे लागणार आहे. सध्या तो सामान्य वार्डमध्ये आहे आणि प्रकृतीत लक्षणीय सुधारणा होत आहे.

बीसीसीआयची वैद्यकीय टीम सतत अय्यरच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असून सिडनीतील तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्कात आहे. त्याला डिस्चार्ज मिळाल्यानंतर थेट भारतात परतवले जाणार आहे. मात्र पूर्णपणे मैदानात परतण्यासाठी त्याला किमान सहा आठवड्यांचा कालावधी लागेल. त्यामुळे पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत तो सहभागी होऊ शकणार नाही.

श्रेयसचे वडील संतोष अय्यर यांनी ऑस्ट्रेलियाला जाण्याचा निर्णय रद्द केला असून त्यांनी डॉक्टरांवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. कुटुंबाला सिडनीहून नियमित अपडेट मिळत आहेत.

दरम्यान, भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव याने सांगितले की, “मी अय्यरशी बोललो आहे, तो आता बरा आहे. तो बोलत आहे, फोन घेत आहे आणि दैनंदिन कामे करत आहे. काही दिवसांत तो पूर्णपणे रिकव्हर होऊन घरी परतेल.”

Comments
Add Comment